नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध शिक्षणक्रमांच्या लेखी परीक्षा सात ते २३ जानेवारी या कालावधीत होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या हिवाळी सत्रातील प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा आणि मे २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या राज्यातील विविध २३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल.
हेही वाचा : जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरणारी महिला ताब्यात, मूल होत नसल्याने उच्चशिक्षित संशयिताचे कृत्य
महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतलेले जवळपास एक लाख नऊ हजार २३७ विद्यार्थी ही परीक्षा देतील. परीक्षेसंदर्भातील आवश्यक ती सर्व शैक्षणिक व प्रशासकीय तयारी विद्यापीठातर्फे पूर्ण करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या पोर्टलवरील परीक्षा या शीर्षकांतर्गत जानेवारी २०२५ च्या परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. अद्ययावत माहिती करीता विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी. या पोर्टलवरच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.