नाशिक : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होणारे शैक्षणिक बदल आणि त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत माहिती होण्यासाठी स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात मुक्त विद्यापीठ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वा शाळांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.
अभियानाच्या नियोजनाच्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीमध्ये विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक तसेच विद्यापीठाच्या आठ विभागीय केंद्राचे विभागीय संचालक तसेच वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार हे सदस्य असतील. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत उपक्रमाची अंमलबजावणी, कार्यक्रमानंतरचा अभिप्राय संकलन व अहवाल सादरीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…नाशिक : नथुराम गोडसे उदात्तीकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस सेवादलाचा मूक सत्याग्रह
स्कूल कनेक्ट अभियानाची उद्दिष्ट्ये
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे. विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती देणे. मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे. शिक्षण अर्धवट सोडून रोजगाराकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त दूरस्थ शिक्षणाच्या संधींविषयी माहिती देणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे. विद्यार्थी शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती देणे. विद्यापीठाच्या विद्यार्थी सहायता कक्षाविषयी माहिती देणे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींविषयी माहिती देणे.