लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारीत स्वतंत्र पदव्युत्तर (एम.ए) अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले. तसेच जगाची व उद्योग क्षेत्राची गरज ओळखून कौशल्य व उद्योजकतेवर आधारित अभ्यासक्रम निर्मितीवर विद्यापीठ भर देणार आहे.
येथे मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्यावतीने मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सोनवणे यांचा आयएमआरटी महाविद्यालयाच्या प्रांगणात सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस डॉ. दिलीप दळवी, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, सिनेट सदस्य सागर वैद्य उपस्थित होते.
हेही वाचा… शासन-सार्वजनिक-खासगी भागीदारीवर नाशिकचा विकास शक्य; ‘मी नाशिककर’तर्फे भविष्यकालीन आराखडा सादर
कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर आधारीत पदव्युत्तर अभ्यासक्रमासह मेलबर्न विद्यापीठाशी तीन ते पाच वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मेंदू विकासावर आधारित शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम, एआय आणि माहिती परीक्षण शिक्षणक्रम सुरु केला जाईल, असे सांगितले. विद्यापीठाच्या माध्यमातून बहुविद्याशाखीय, विद्यार्थी परिपक्व बनेल, याकरिता निरंतर मूल्यमापन करणारे तसेच ज्ञानयुक्त समाज निर्माण करेल असे शिक्षण देण्यावर भर राहील, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
हेही वाचा… अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर
अध्यक्षीय मनोगतात ॲड. ठाकरे यांनी तळागाळासोबत नाळ जोडलेल्या समाजातील विविध स्तरातील प्रश्नांची जाणीव असलेले व्यक्तिमत्व म्हणून डॉ. संजीव सोनवणे यांना ओळखले जाते, असे सांगितले. त्यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे हक्काचे व्यक्तिमत्व लाभल्याचे नमूद केले. शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांना नव्या शैक्षणिक धोरणाची ओळख करून देणारा एखादा शिक्षणक्रम तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, गरज भासल्यास शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत जावे असे सांगितले. यावेळी वसंत खैरनार, वैद्य विक्रांत जाधव, महात्मा गांधी विद्या मंदिरचे सहसचिव व्ही. एस. मोरे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, नाशिक शाळा संघटनेचे सचिन जोशी, सिनेट सदस्य सागर वैद्य, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे आदींनीही विचार मांडले.