यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी हिंदी, डोगरी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक तथा चित्रपट लेखक, दिग्दर्शक वेद राही यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी येथे ही घोषणा केली. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठातर्फे २०१० पासून कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दिला जातो. मूळचे जम्मू-काश्मीरचे असणाऱ्या राही यांनी उर्दू, हिंदी आणि डोगरी भाषेत विपुल लेखन केले. डोगरी भाषेत सात कादंबऱ्या, तीन कथासंग्रह आणि एक काव्यकथा अशी ग्रंथसंपदा आहे. हिंदी, उर्दू भाषेतील काले हत्थे, आले, क्रॉस फायरिंग आदी कथासंग्रह, झाडमू बेदी ते पत्तन, परेड, टूटी हुई डोर, गर्म जून आदी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. काश्मिरी संत कवींच्या जीवनावर आधारित मूळ डोगरी भाषेतील त्यांची ‘लाल देड’ कादंबरी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
रामानंद सागर यांच्या आग्रहाखातर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांच्यासोबत त्यांनी जवळपास २५ चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लेखन केले. त्यात बेजमुबान, चरस, संन्यासी, बे-ईमान, मोम की गुडिया, आप आये बहार आई, पराया धन, पवित्र पापी आदींचा समावेश आहे. काही दूरदर्शन मालिका, अनेक माहितीपट, लघुपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर’ या चरित्रपटामुळे आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय अशा ‘गुल गुलशन गुलफाम’ या मालिकेमुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच जम्मू-काश्मीर सरकारने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
तीनसदस्यीय निवड समितीने राही यांची कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी निवड केली. लवकरच आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि कुसुमाग्रज अध्यासनच्या प्रमुख प्रा. डॉ. विजया पाटील यांनी सांगितले.