लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: केळीची कापणी करताना व्यापार्यांकडून घेण्यात येणारी तीन टक्के कटती रद्द करण्याचा शेतकरी हिताचा महत्त्वाचा ठराव यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला असून, या निर्णयाचे उल्लंघन करणार्यासंदर्भात तक्रार आल्यास संबंधित व्यापार्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. केळी उत्पादकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा झाली. सभापती हर्षल पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील, सागर महाजन, अशोक चौधरी, नारायण चौधरी, राकेश फेगडे, पंकज चौधरी, उमेश पाटील, दीपक चौधरी, यशवंत तळेले, विलास पाटील, सुनील बारी, संजय पाटील, उज्जैनसिंग राजपूत, कांचन फालक, राखी बर्हाटे आदींची उपस्थिती होती. सभेत केळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
आणखी वाचा-नाशिक: दिंडोरीतील निमा कार्यालयाचे आज उद्घाटन
केळी कापून मोजमाप झाल्यानंतर मालमोटारीचे वजन इलेक्ट्रॉनिक्स तोल-काट्यावर करतात. त्यावर व्यापार्यांकडून तीन टक्के कटती कापण्यात येत असे. त्यामुळे शेतकर्यांचे एकूण वजनात तीन टक्के इतके आर्थिक नुकसान होत होते. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत शेतकर्यांकडून कापली जाणारी तीन टक्के कटती यापुढे घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेत ठराव करण्यात आला. तसेच यापुढे तीन टक्के कपातीची तक्रार आल्यास संबंधित केळी व्यापार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठरावही संचालक मंडळाने सर्वानुमते केला.त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरू करण्यात आली आहे. सचिव स्वप्नील सोनवणे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. या निर्णयाची माहिती बाजार समितीतर्फे परवानाधारक केळी व्यापारी, दलालांना देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.