जळगाव : जिल्ह्यातील यावल अभयारण्यातून अंजिरी चारुशिखी, हिरवा लगाम, सोनआमरी या तीन पुष्पवनस्पती प्रजातींची नोंद झाली असून, वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांनी शोधून काढलेल्या या तीन पुष्पवनस्पती प्रजातींच्या नोंदी बायोइंफोलेट या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाल्या आहेत. या तीन पुष्पवनस्पती प्रजातींच्या नोंदींमुळे यावल अभायारण्यातील पुष्पवनस्पती प्रजातींची संख्या २७ झाली आहे.
संपन्न वनसंपदा व जैवविविधता असूनही सर्वच स्तरांवर दुर्लक्षित राहिलेल्या यावल अभयारण्यातून राहुल व प्रसाद सोनवणे यांनी वनविभागाच्या सहकार्याने अनेक दुर्मिळ व संकटग्रस्त वनस्पती, पक्षी, प्राणी शोधून काढले. यावल अभयारण्यात नुकत्याच केलेल्या संशोधनात राहुल व प्रसाद सोनवणे यांना अंजिरी चारुशिखी, हिरवा लगाम व सोनआमरी या तीन पुष्पवनस्पती प्रजातींची नोंद घेण्यात यश आले. या तीन पुष्पवनस्पती प्रजातींच्या नोंदी बायोइंफोलेट या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाल्या आहेत. या संशोधनासाठी त्यांना धुळे येथील वनसंरक्षक डिगंबर पगार, यावल अभयारण्य विभागाच्या तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे व डॉ. सुधाकर कुर्हाडे यांचे मार्गदर्शन, तसेच यावल अभयारण्य विभागाचे अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, अमन गुजर, मयूरेश कुलकर्णी, रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, योगेश गालफाडे, चेतन भावसार, नीलेश ढाके यांचे सहकार्य लाभले.
यावल अभयारण्य दुर्लक्षित
पुष्पवनस्पती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांसाठी, रहस्यमय जीवनचक्रासाठी जगभरातील वनस्पती अभ्यासक, संशोधकांसह वनस्पतीप्रेमींसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. या वनस्पतींचे वैद्यकीय व पारिस्थितिकीय मूल्य अधिक आहे. एखाद्या जंगलातील पुष्पवनस्पतींची विविधता व संख्या तेथील परिसंस्थेच्या सदृढतेचे लक्षण आहे. यावल अभयारण्यात मोठ्या संख्येत पुष्पवनस्पती आढळणे हे येथील जंगलांच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. जळगाव जिल्ह्यात यावल अभयारण्यासारख्या पुष्पवनस्पती इतरत्र कुठेही आढळत नाहीत. जगात २८,००० पेक्षा अधिक वेगवेगळ्या पुष्पवनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जास्त प्रमाणात गवत असणार्या ठिकाणी पुष्पवनस्पती जमिनीवर येतात. पुष्पवनस्पतींच्या काही प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
संकटग्रस्त आमरी प्रजाती : अंजिरी चारुशिखी
पहिल्या पावसासोबत उगवणारे आर्द्र पानझडी वनांमध्ये आढळणारे अल्पजीवी भूस्थित पुष्पवनस्पती. सातपुड्यात डोंगर उतारांवर, पालापाचोळ्यात तसेच खुल्या जागांमध्ये या वनस्पतींचे जमिनीबाहेर आलेले गुलबट, जांभळट पांढर्या रंगाचे फुलोरे अगदी तुरळकपणे पाहावयास मिळतात. ही संकटग्रस्त आमरी प्रजाती आहे.
दिवसा गंधविना; रात्री उग्र वास : हिरवा लगाम
सदाहरित, निमसदाहरित तसेच पानझडी वनांमध्ये दाट सावलीत, पालापाचोळ्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जंगलातील उंचावरील, जास्त पावसाच्या भागात ही भूस्थित पुष्पवनस्पती वाढते. जमिनीतील १-२ कंदांपासून वाढलेल्या २-३ पानांसोबत हिरव्या रंगाच्या फुलांचा दांडा बाहेर आलेला असतो. फुले वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असून, त्यांना दिवसा गंध नसतो; परंतु सायंकाळी व रात्री फुलांतून उग्र वास येतो. विशिष्ट प्रकारच्या कीटकांची परागणासाठी आवश्यकता असल्याने फुलांत झालेले हे अनुकूलन आहे.
शुष्क, आर्द्र पानझडी वनांत आढळते : सोनआमरी
पावसाळ्याच्या शेवटी फुलणारे व महाराष्ट्रातील शुष्क आणि आर्द्र पानझडी वनांत बहुतेक ठिकाणी गवताळ भागात आढळणारी भूस्थित पुष्पवनस्पती. जंगलातील ओलसर जागांमध्ये या पुष्पवनस्पतींची हिरवी-पिवळी फुले गवतातून बाहेर डोकावताना लक्ष वेधून घेतात. याची हिरवट-पिवळ्या फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे या पुष्पवनस्पतीला ऑक्टोपस हेही नाव आहे.
या तीन पुष्पवनस्पती प्रजातींच्या नोंदींमुळे यावल अभायारण्यातील पुष्पवनस्पती प्रजातींची संख्या 27 झाली आहे. पुष्पवनस्पती प्रजातींची ही संख्या महाराष्ट्रात आढळणार्या एकूण संख्येच्या 25 टक्के आहे. यातून यावल अभयारण्याची समृद्ध वनसंपदा, संपन्न जैवविविधता व पारिस्थितिकीय मूल्य अधोरेखित होते. या वनस्पती खूप अधिवास संवेदनशील आहेत. म्हणून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासांचे जतन होणे अत्यावश्यक आहे.
– प्रसाद सोनवणे (वनस्पती अभ्यासक, जळगाव)
यावल अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत अभयारण्यात केवळ दोन वनपाल व दोन वनरक्षकांची नियुक्ती आहे. अगदी तोडक्या मनुष्यबळाकडे जळगाव जिल्ह्याचे वैभव असलेल्या यावल अभयारण्याच्या सुंदर जंगलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. असेच दुर्लक्ष होत राहिल्यास जळगाव जिल्ह्यातील पुष्पवनस्पती प्रजातींचा हा समृद्ध अधिवास नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.