नाशिक : संविधान संवर्धनासाठी सज्ज होण्याचे आवाहन करतानाच केंद्र आणि राज्य सरकारने शालेय व विद्यापीठ स्तरावर संविधान हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, प्रबुद्ध लोककला विद्यापीठाची स्थापना करावी, यासह एकूण १० ठराव येवला येथे आयोजित पहिल्या संविधान लोककला साहित्य संमेलनात मांडण्यात आले.लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), शिक्षण विभाग, भारतीय अकॅडमी, कास्ट्राईब शिक्षक संघटना, राष्ट्र सेवादल,अध्यापकभारती यांच्या संयोजनात हे संमेलन येवला येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात झाले.

संमेलनाचे उदघाटक उत्तम कांबळे यांनी, लोककला संविधानाला नवे रूप देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. व्यवस्थेच्या बरगड्या तोडून जे उगवते त्याला मरण नाही. गुलामीच्या जगण्यातून बाहेर काढण्यासाठी हे संविधान बळ देते,असे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांनी, मातीतले गाणे मारण्याचे काम या देशात चालू असल्याचे सांगितले. मनुवाद्यांनी संविधान जाळण्याची हिम्मत दिल्लीत केली होती. यावर थोडेफार वगळता कोणीही बोलले नाही. संविधानाबद्दल बोलणे हा भविष्यात गुन्हा ठरू शकेल, असा कायदा येतो आहे. याचा सरकारला जाब विचारण्याची गरज त्यांनी मांडली. गायक नंदेश उमप यांनी, पोवाड्यासारखी संविधानाची कथा सांगितली गेली पाहिजे, असे सांगितले.

संमेलनाचे संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी भारतीय संविधानिक विचार, तत्व, मूल्यांचा प्रचार प्रसार व संवर्धन विविध सांस्कृतिक कलाविष्कारातून लोक प्रबोधन-सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केल्याचे नमूद केले. व्यासपीठावर श्यामसुंदर महाराज सोन्नर, शाहीर हमीद सय्यद, स्वप्नील डुंबरे, प्रवीण जाधव,राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, प्रा. तुळशीराम जाधव हेही उपस्थित होते.

सूत्रसंचालन वनिता वाघ, नम्रता ससाणे, रंजना भोये यांनी केले. आभार अजिज शेख, गोकुळदास वाघ यांनी मानले.प्रारंभी आझाद चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून संविधान सन्मान फेरी काढण्यात आली. विंचूर चौफुलीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

संमेलनातील ठराव

१) केंद्र व राज्य सरकारने शालेय व विद्यापीठ स्तरावर संविधान हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.

२) सामाजिक लोकप्रबोधनासाठी प्रबुद्ध लोककला विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी.

३) इयत्ता ११ आणि १२ वी वर्गांसाठी संविधान हा विषय स्वतंत्र ५० गुणांसाठी निश्चित करावा.

४) नवीन शैक्षणिक धोरणात होणारे शिक्षणाचे धार्मिकीकरण खासगीकरण तत्काळ थांबवावे.

५) संविधानिक मूल्य व्यवस्था आपल्या कलाकृतीतून अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न निर्माते, लेखक, दिग्दर्शक, साहित्यिक, कलावंत यांनी सातत्याने करावा. यांसह एकूण १० ठराव मांडण्यात आले.