नाशिक – जिल्हा नियोजन समितीने बचत निधीचे नियोजन करताना उपलब्ध निधीच्या दहापट कामे मंजूर केल्यामुळे आमदारांना नव्या कामांसाठी निधी मिळणार नसल्याची तक्रार करीत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मध्यंतरी आमदार छगन भुजबळ यांनी दिला होता. तथापि, नंतर भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रिपद मिळाले आणि अल्पावधीत निधीची चिंता मिटली. येवला मतदार संघातील रस्ते, पूल बांधणीच्या सुमारे ३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध शासकीय यंत्रणांकडे बचत झालेल्या निधीचे फेरनियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्याची तक्रार गेल्या जूनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यपद्धतीने कुणाही आमदाराला एक पैसाही निधी मिळणार नाही. नवीन कुठलेही कामे करता येणार नाहीत. याची चौकशी होण्याची गरज भुजबळ यांनी मांडली होती. या बाबत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सोबतीने त्यांनी नियोजन विभागाकडे तक्रार केली होती. निधी वाटपावरून पालकमंत्री दादा भुसे-भुजबळ यांच्यात वाद उभा राहिला. पुढील काही दिवसात राजकीय चित्र बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांनाही मंत्रिपद मिळाले आणि विकास कामांच्या निधीचा जणू प्रश्न मिटल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>जळगाव: पाचोर्‍यानजीक बस-मालमोटार अपघातात १५ विद्यार्थी जखमी

भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदार संघातील ३६ कोटी ४४ लक्ष २३ हजार रुपयांच्या रस्ते, पुलांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. येवल्यातील काही रस्त्यांची व पुलांची दुरवस्था झाल्याने त्यांच्या सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी त्यांनी पुरवणी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार येवला तालुक्यातील अनकाई-कुसमाडी-नगरसूल-अंदरसूल ते पिंपळगाव जलाल रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी ५० लाख, वापी-पेठ-नाशिक-निफाड-येवला-वैजापूर-औरंगाबाद-जालना रस्ता प्रमुख राज्य मार्ग दोन या रस्त्यासाठी सुमारे तीन कोटी, येवला-नागडे-धामणगाव-धोमोडे-बिलोनी ते ७५२ जी रस्त्यावर मध्ये संरक्षण भिंत बांधण्यासाठी साडेतीन कोटी, पढेगाव अंदरसुल-न्याहारखेडा-रेंडाळे-ममदापूर रस्ता जिल्हा मार्ग रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी एक कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: पोलिसांकडून रात्रभर विशेष तपासणी मोहीम, चार फरार गुन्हेगार ताब्यात

याशिवाय मतदारसंघातील अन्य रस्ते, पुलांच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. लासलगाव, विंचूर व देवगाव येथील मंडल अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकाम करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून ४५ लाखाचा निधी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना महसुली सेवा मिळविण्यासाठी मदत होईल. रस्ते व पुलांची कामे मार्गी लागल्याने दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yewale works worth 36 crores included in the supplementary budget amy
Show comments