लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शहरातून मोताळा येथे रंगाचे डबे घेऊन निघालेल्या प्रवासी रिक्षाला नशिराबाद गावानजीक उड्डाणपुलावर मागून येणार्या भरधाव मोटारीची धडक बसल्याने रिक्षा उलटून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाले.
अस्मानी शेख मंजूर (३०, बोरखेडी, बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. जळगावकडून रिक्षातून रंगाचे डबे घेऊन काही प्रवासी भुसावळकडे जात होते. मोटारीची रिक्षाला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून अस्मानी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.
आणखी वाचा-जैन मंदिरातील चोरीस गेलेल्या मूर्ती ताब्यात; दोन संशयितांना अटक
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह नशिराबाद येथील पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहायक फौजदार हरीश पाटील यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात रिक्षातील जुबेर शेख (४०), करीम बेग (२९), शेख सादिक (४०) आणि शेख उमेमा (सहा) गंभीर जखमी झाले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.