गावातील अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुणाने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भूषण पाटील असे तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढले आहे. मात्र, काही राजकीय पुढार्यांमुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जात नसल्याची भूषण पाटील याची तक्रार आहे. अतिक्रमण हटवून तेथे अद्ययावत बसस्थानक होईल एवढीच जागा आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे पाटील याने वेळोवेळी तक्रारी केल्या. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेे. त्यामुळे त्रस्त झालेला पाटील हा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आला. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोल भरलेल्या कॅनसह पाटील याला ताब्यात घेतले. पाटील याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.