लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगावजवळच्या कन्नड घाटात शनिवारी सायंकाळी भरधाव मोटार दरीत कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात इतर तीन जण जखमी झाले असून, त्यापैकी एक गंभीर आहे. अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
मुकेश महाजन (३६,रा. नाशिक) यांच्यासह विजय महाजन, जितेंद्र महाजन आणि दीपक बोराडे (रा.न्हावी, ता.यावल, जळगाव) हे चौघे शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरकडून चाळीसगावकडे कन्नड घाटातून मोटारीने जात होते. जय मल्हार गडाजवळ चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटार शेजारच्या खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात एवढा भीषण होता, की मोटारीतील मुकेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.
सदरच्या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार, हवालदार संदीप पाटील, नंदलाल परदेशी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य सुरू केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करून जखमींना उपचारासाठी चाळीसगावमध्ये दाखल करण्याची कार्यवाही केली.