लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: शहरातील सोयगाव भागात मंगळवारी दुपारी सुनील गुंजाळ या तरुणाची धारदार शस्त्राने टोळक्याकडून हत्या करण्यात आली. भरदिवसा आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या हत्येने सोयगाव परिसर हादरुन गेला आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.
दुपारी दीडच्या सुमारास सुनील हा दुचाकीने कॅम्प ते टेहरे फाटा या रस्त्याने जात होता. त्यावेळी दोन दुचाकींवर स्वार संशयित त्याचा पाठलाग करीत होते. सुनील हा सोयगावच्या इंदिरा नगरजवळ पोहचला असता संशयितांनी प्रथम त्याची दुचाकी जमिनीवर पाडली. तेव्हा प्रसंगावधान राखत जीव वाचविण्यासाठी सुनीलने पळत सुटला. संशयितांनी धारदार शस्त्राने वार केल्याने तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर सपासप वार करीत काही क्षणात संशयितांनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश काळे हे घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनील यास त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मारेकऱ्यांची संख्या पाच ते सहा होती. हत्या झालेला तरुण कॅम्प भागातील गवळीवाडा भागातील रहिवासी होता. हत्येचे कारण आणि मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. अंगाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेने सोयगाव व कॅम्प परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक तेजबिरसिंह संधू यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली