नाशिकमधील बोधले नगर परिसरात तुषार चावरे नावाच्या १८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. हत्येच्या घटनेनंतर कोणताही पुरावा नसतानाही उपनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
सुलतान मुख्तार शेख(वय २१), रोहीत मनोहर पगारे (वय १८, दोघे रा. गांगुर्डे चौक, पंचशील नगर, उपनगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. या दोन आरोपीबरोबर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मृत तुषार एकनाथ चावरे (वय १८, रा. सुयोगनगर) हा मित्र सचिन गरुड याच्यासह पुणे रस्त्यावरील बोधलेनगर परिसरातून दुचाकीवरुन जात होता.
यावेळी संशयित आरोपी मोपेड बाईकवरुन तिथे आले. त्यांनी चावरेला दमदाटी करत हत्यारे दाखवली. यानंतर चावरे याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चंद्रमा टिंबर मार्टकडे पलायन केलं. त्यानंतर संशयितांनी त्याचा पाठलाग करुन चॅापर आणि धारदार हत्यारांनी डोक्यावर, पोटावर आणि पाठीवर वार केले. या घटनेत तुषारचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतलं.
मृत तुषारने आरोपी सुलतानला केली होती मारहाण
प्रेमसंबंध आणि छेडछाडीच्या वादातून पंधरा दिवसांपूर्वी मृत तुषार चावरे याने गुंडगिरीची भाषा वापरत आरोपी सुलतानला मारहाण केली होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इंदिरानगर भागात दोघांचं भांडणही झालं होतं. त्यामुळे मारहाण आणि भांडणाचा बदला घेण्यासाठी संशयितांनी तुषार चावरेची हत्या करण्याचा कट रचला. यातून शनिवारी आरोपींनी तुषार चावरेची हत्या केली. मृत चावरे हाही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता, अशीही माहिती पोलिसांकडून मिळाली.