आडगावच्या युवा खेळाडूकडे जिल्ह्याची नजर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अविनाश पाटील

नाशिक : एखाद्याला केवळ चांगले खेळता येते म्हणून कोणी चांगला क्रीडापटू होत नाही. घरातून पािठबा मिळणे आणि त्यासाठी सर्व प्रकारचे स्वातंर्त्य आवश्यक असते. हे सर्व काही मिळाल्यावर तो खेळाडू थेट प्रो कबड्डी स्पर्धेपर्यंत पोहोचू शकतो. जिल्ह्यातील आडगाव येथील युवा कबड्डीपटू आकाश शिंदेची कथा हेच सांगते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी प्रो कबड्डी लीगच्या यंदा सुरू झालेल्या आठव्या हंगामात आकाशची नवीन युवा खेळाडू म्हणून पुणेरी पलटण या संघाकडून निवड झाली आहे.

आडगाव हे मुळातच कबड्डीप्रेमी गाव. गावातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेकडे फिरकल्यास दररोज कित्येक जण कबड्डीचा सराव करताना दिसतात. त्यामुळे वडील कबड्डीचे खेळाडू असलेल्या घरातील आकाश या मैदानाकडे आकर्षित न झाल्यासच नवल. इयत्ता पाचवीपासूनच आकाश कबड्डीमध्ये आपले कौशल्य दाखवू लागला. त्यात तो प्रगत होऊ लागला. पुढे गावातील ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सागर माळोदे, प्रा. संतोष जाधव, प्रा. विनोद लभडे, गिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खेळ अधिकच बहरू लागला. तंत्र आणि बारकावे याची शिकवण त्याला मिळाली. जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्पर्धामध्येही त्याची चमक दिसू लागली.

दरम्यान, इयत्ता १० वीनंतर वडिलांनी आकाशला आष्टी येथील प्रशिक्षक अधिक चांगले कबड्डी शिकवीत असल्याचे कळल्यामुळे त्यास तिकडे शिक्षणासाठी पाठविले. शिक्षण आणि कबड्डी अशी त्याची कसरत सुरू झाली. मैदानावर कित्येक तास कबड्डीच्या सरावाला देत असतानाही तो इयत्ता १२ वी ७३ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. सध्या तो जिल्ह्यातील सुरगाणा महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. शाळेत जाणे सुरू झाल्यापासून कबड्डीच्या प्रेमात पडलेल्या आकाशला घरातून पाठबळ मिळाल्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचू शकला आहे. इयत्ता १२ वीनंतर आकाशचे वडील संतोष शिंदे यांनी व्यवसायात मदत होईल म्हणून आकाशला इलेक्ट्रॉनिक्सकडे पाठविण्याचे निश्चित केले होते. परंतु, आकाशची एकंदर आवड पाहून बेत बदलून त्याला कबड्डी जोपासता यावी यासाठी कला शाखेत प्रवेश घेतला.

२०१८-१९ मध्ये सिन्नर येथे झालेल्या राज्य वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेप्रसंगी मुंबईच्या सागर बांदेकर यांनी आकाशची गुणवत्ता हेरली. मिहद्रा आणि मिहद्रा या व्यावसायिक संघात त्याची निवड केली. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरातील व्यावसायिकता आणि स्पर्धा यांच्याशी आकाशची ओळख झाली. मुंबईतच मग पुणेरी पलटणचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी कर्णधार अनुपकुमार यांची नजर आकाशवर पडली. त्यांनी त्याला पुणेरी पलटणच्या युवा पलटण विभागासाठी निवड केली. वर्षभरापासून आकाश युवा पलटणकडून सराव करीत आहे. आकाशचा लहान भाऊ हृषीकेश हाही क्रीडापटू असून तो उत्कृष्ट नौकानयनपटू आहे. नाशिक येथील के.टी.एच.एम. बोट क्लबचा सदस्य आहे. वडील संतोष शिंदे हे शेतकरी असले तरी सौरऊर्जा उपकरणे आणि बायोगॅसचा व्यवसायही आहे.

या हंगामात पुणेरी पलटणचे तीन सामने झाले असून तेलगु टायटन्सविरुद्ध अवघ्या एका गुणाच्या अंतराने (३४-३३) मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता पलटणला अजून लय सापडलेली नाही. पलटणचा ३१ डिसेंबरला तमिळ थलाइव्हजविरुद्ध सामना असून तीन सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेल्या आकाशला या सामन्यात संधी मिळावी, हीच आडगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींची अपेक्षा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young player shine pro kabaddi ysh
Show comments