जळगाव – रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळा बाजार करणार्यांवर रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पथकाने कारवाई करीत एकाला ताब्यात घेतले असून, तो ई-आरक्षण रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना मिळून आला. त्याच्याकडून एकूण १७ हजार ३६७ रुपयांची नऊ तिकिटे जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र घोलप (वय ३४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा – नाशिक: मखमलाबाद, कामटवाड्यात नवीन मलजल शुध्दीकरण केंद्राचे नियोजन
रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक मनोज सोनी, मुख्य आरक्षण अधिकारी सुनील मराठे, विनोद जेठवे यांना जिल्हापेठ परिसरातील डॉ. आंबेडकर व्यापारी संकुलानजीकच्या लक्ष्मी निवास या निवासस्थानात संशयास्पद युझर आयडीवरून तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पथकाने तपासणी केली असता, नरेंद्र घोलप याची विचारणा केली. गेल्या दीड वर्षापासून तो स्वत:च्या भ्रमणध्वनी संचाचा वापर करीत रेल्वेचे ऑनलाइन आरक्षित तिकिटांचे लॅपटॉपवरून बुकिंग करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. तो प्रवाशांकडून तिकिटाच्या रकमेपेक्षा ५० ते १०० रुपये अधिक घेत होता. पथकाने त्याला लॅपटॉपसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सुमारे १७ हजार ३६७.९५ रुपयांची नऊ रेल्वे तिकिटे असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे अधिनियमनानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.