नाशिक : अर्धवेळ ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणे, युवकाला महागात पडले. नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी त्यास २४ लाख २५ हजार रुपयांना गंडविले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य अहिरराव (२६, रा. अयोध्यानगरी,अमृतधाम) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. आदित्य हा तरूण गेल्या महिन्यात इंटरनेटवर आभासी पध्दतीने काही व्यवसाय करता येतो का, याचा शोध घेत होता. त्यावेळी सायबर भामट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. ९१९२६३८५५८८१ या क्रमांकावरुन संभाषण करत भामट्याने आदित्यचा विश्वास संपादन केला. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. भामट्याने वेगवेगळ्या बँक खात्यावर तसेच युपीआय आयडीच्या माध्यमातून आदित्य यास पैसे भरण्यास भाग पाडले. आदित्याने २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २४ लाख २५ हजार ५०५ रुपये गुंतवले. संशयितांचा संपर्क तुटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेतली. सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर पोलिसांना बँक खात्यात असलेले चार लाख रुपये गोठविण्यात यश आले.
हेही वाचा >>>नाशिक : कृषी विभागाच्या भरती परीक्षेत परीक्षार्थीकडे संशयास्पद साधने
नाशिक ग्रामीणमध्येही फसवणूक
फॉरेक्स मार्केट कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक पटीने परतावा देण्याचे आमिष दाखवत भामट्याने माजी सैनिक मंगेश रहाणे यांना गंडवले. रहाणे यांनी आमिषाला भुलून १६ लाख, ८२ हजार, ७९७ रुपये गुंतविले. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.