नाशिक – प्रादेशिक परिवहन विभागात उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) पदावर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली संशयितांनी एका बेरोजगारास २४ लाख २० हजार रुपयांना फसविल्याचे उघड झाले आहे. पैसे दिले असताना पाच वर्षे उलटूनही नोकरी मिळाली नाही. बेरोजगार युवकाने पाठपुरावा केला असता संशयितांनी बनावट मेलवरून खोटे नियुक्तीपत्र पाठवून दिशाभूल केली.
याबाबत पुंजाबा सोनवणे (समुद्रनगर, सातपूर) यांनी तक्रार दिली. कैलास ठाकूर, छगन अग्रवाल, पवन भूतडा आणि उज्वला वठारक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सोनवणे यांची २०२० मध्ये संशयितांशी भेट झाली होती. यावेळी त्यांनी सोनवणे यांचा विश्वास संपादन करुन त्यांचा बेरोजगार मुलगा वैभवला आरटीओत उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी पैसे मागण्यात आल्याने सोनवणे यांनी रोख आणि ऑनलाईन पद्धतीने तब्बल २४ लाख २० हजाराची रक्कम संशयितांना दिली. परंतु, पाच वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. त्यामुळे सोनवणे बाप-लेकाने पैसे परत मिळावेत म्हणून तगादा सुरू केला. तेव्हा संशयितांनी नामी शक्कल लढवत वैभव सोनवणे याच्या नावाने आरटीओ कार्यालयात उपनिरीक्षक (सब इन्स्पेकर) या पदावर निवड झाल्याबाबत बनावट मेल पाठवला. या नियुक्ती पत्राच्या आधारे सोनवणे बाप-लेकाने चौकशी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे बाप-लेकाने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.