नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे महात्मा गांधी रस्त्यावरील पक्ष कार्यालय ते बडी दर्गा अशी यात्रा जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात येवून “रोजगार दो, न्याय दो” अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी एहसान खान, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सचिव डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते. रोजगाराचे खोटे आश्वासन, वाढती महागाई, भरती प्रक्रियेत घोटाळा, या मुद्द्यांकडे युवक काँग्रेसने यात्रेव्दारे लक्ष वेधले. अराजकीय लोकांचा, युवावर्गाचा प्रत्यक्ष सहभाग आगामी काळात या यात्रेत करून राज्यात, जिल्ह्यात परिवर्तन घडविणार असल्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा…धुळ्यात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जाळ्यात
काँग्रेस सेवादलतर्फे आज मूक सत्याग्रह
नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रामकुंड येथील गांधी ज्योतसमोर मूक सत्याग्रह आंदोलन शुक्रवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला व देशाला देशहिताचा, अहिंसेचा व मानवतेचा संदेश दिला असताना जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम विशिष्ट संघटना करत आहेत. याविरोधात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केले