मनमाडमधील घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश
मनमाड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लांबविण्यात आला होता. या घटनेचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पकडण्यात आलेल्या दोघांनी केवळ मौजमजा करण्याच्या इराद्याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या बाबतची माहिती नाशिकचे प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. आकाश अनिल अहिरे (२२) व अभिलाष दिनकर बनकर (२०) ही पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते दोघे मनमाडचे रहिवासी आहेत. त्यातील एक खासगी कंपनीत कामगार असून एक स्वयंपाक्या आहे.
भाडय़ाची गाडी लावून शिर्डी, सप्तशृंगी गड आदी ठिकाणी जाऊन घरफोडीतून मिळालेली रोख रक्कम आणि दागिने विक्रीतून मिळालेले पैसे उधळत पाच-सात मित्रांसह या दोघांनी मौजमजा करण्याचा सपाटा लावला.
घरफोडीतील दागिने विक्रीसाठी नाशिकरोडकडे निघाले असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.
मनमाडच्या शिवाजीनगर भागातील वाल्मीक घायाळ हे व्यापारी बाहेरगावी गेल्याची संधी साधून संशयितांनी २४ नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या घरातून २२ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज चोरला होता. या प्रकरणी मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मनमाडमधील या गुन्ह्य़ाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष लक्ष केंद्रित केले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस संशयितांच्या मागावर होते. त्यांच्याकडून १४० ग्रॅम सोन्याचे दागिने, ५९ हजारांची रोकड व भ्रमणध्वनी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोघा संशयितांनी यापूर्वी किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या केल्या होत्या. मात्र त्यामुळे भीड चेपत गेल्याने प्रथमच मोठय़ा स्वरूपातील घरफोडी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
चोरीच्या पैशांतून मौजमजा करण्यात या दोघांबरोबर अजून काही मित्र सहभागी झाले होते, तरी घरफोडीच्या गुन्ह्य़ात मात्र त्यांचा सहभाग आढळून आला नसल्याचे कडासने यांनी स्पष्ट केले.

Story img Loader