नंदुरबार : पर्यटनस्थळी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे घडली आहे. तोरणमाळच्या सिताखाई पॉइंटवर दाट धुळे असताना एक युवक छायाचित्र घेत असता त्याचा पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला. त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मदतीने मंगळवारी त्याचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथील भारत पावरा (२१) हा त्याच्या मित्र व नातेवाईकांबरोबर धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे पर्यटक म्हणून गेला होता. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगाळ वातावरण व धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे सिताखाई पॉइंटवर धोक्याच्या ठिकाणी छायाचित्र काढण्याचा मोह भारतला झाला. छायाचित्रासाठी तो दरीच्या ठिकाणी असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. या घटनेनंतर त्याचा दरीत शोध घेण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक नीलेश तांबे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, हवालदार काशिनाथ साळवे, रणसिंग सनेर, पोलीस नाईक दादाभाई साबळे, शैलेश राजपूत, अजित गावित, मोहन साळवे, पोलीस शिपाई वसंत वसावे, राकेश पावरा, प्रल्हाद राठोड यांच्यासह रोमा गावातील ग्रामस्थ जीवन चौधरी आणि इतरांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पावसामुळे व दाट धुक्यामुळे दरीतून मृतदेह काढतांना पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागले. म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात डाॅक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली. शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. म्हसावद पोलीस ठाण्यात दरबार पावरा यांच्या माहितीवरुन नोंद करण्यात आली.

हे ही वाचा… अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतील गुलाबी वातावरण, वाहनेही गुलाबी

आपले आयुष्य लाख अनमोल आहे. सेल्फी काढतांना कोणीही धोकेदायक ठिकाणी उभे राहून जिवाला धोका निर्माण होईल, असे धाडस करु नका. पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी छायाचित्र काढू नये. आपल्यानंतर आपल्या कुटूंबियांचे काय होईल, याचा विचार करा. पर्यटनस्थळी खबरदारी घेणे आवश्यक आहे.- राजन मोरे (प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे म्हसावद, नंदुरबार)

हे ही वाचा… काळाराम मंदिर दर्शनासह शेतकरी, महिला, उद्योजकांशी चर्चा, आजपासून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा

सुरक्षारक्षकाची नेमणूक गरजेची

तोरणमाळ राज्यातील थंड हवेचे ठिकाण असून श्रावण महिन्यात येथील सौंदर्य अधिक खुलते. यामुळे राज्यभरातून पर्यटक येथे हजेरी लावतात. असे असले तरी येथे आत्महत्या झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. अनेकदा पर्यटक दरीत कोसळून अपघात होतात. यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth fell into a valley died at toranmal hill station while taking photographs asj