जळगाव – तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात भावासोबत लाकडे गोळा करण्यासाठी गेलेला तरुण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. रविवारी ही घटना घडली. तरुणाने हिमतीने बिबट्याला अंगावरून बाजूला फेकले. मात्र, बिबट्याने पंजे मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
मदन अहिरे (२५) हा मोठा भाऊ राजेंद्र अहिरे (२८) याच्यासोबत गावाजवळील जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेला होता. राजेंद्र हा त्याच्यापुढे चालत होता. मदन हा मागे लाकडे गोळा करीत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. मदनने हिमतीने अंगावर आलेल्या बिबट्याला बाजूला फेकले. आरडाओरड सुरू केली. त्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने जंगलात धूम ठोकली. आरडाओरडमुळे परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. राजेंद्र याने रक्तबंबाळ अवस्थेतील मदन याला ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले.
हेही वाचा – “छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनी कधीही…,” सुहास कांदेंनी दिलं आव्हान
दरम्यान, भुसावळ येथे जामनेर रस्त्यावरील निमगाव शिवारातील कोरड्या विहिरीत मध्यरात्री पडलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.