लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक – देवळा तालुक्यातील भऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला. युवकास कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.देवळा तालुक्यातील मुलुखवाडी येथील भूषण वाघ (२५) हा भाचीच्या लग्नासाठी सोमवारी भऊर येथे आला होता. सकाळी सहा ते साडेसहा या वेळेत भूषण बाहेर गेला असता सार्वजनिक शौचालयाजवळ बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.
भूषणने जोरजोरात आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला आणि झाडावर चढला. या हल्ल्याची माहिती मिळताच शेजारच्या आदिवासी वस्तीतील काही ग्रामस्थ आणि युवकांनी बिबट्याला हुसकावून लावले. जखमी झालेल्या भूषणला तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी सरपंच दादा मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी घटनास्थळी भेट देत जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. गिरणा नदीकाठी बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याने त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.