लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: आई व पत्नीस वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या त्रासास कंटाळून मद्यपी पित्याची हत्या केल्याप्रकरणी तालुक्यातील टेहरे येथील ज्ञानेश्वर बोरसे या तरुणास येथील न्यायालयाने जन्मठेप व दोन लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रकाश बोरसे (६०) हे दारुची नशा करुन पत्नी व सुनेस शिविगाळ व मारहाण करीत असत. या त्रासाला घरातील सदस्य कंटाळले होते. १४ डिसेंबर २०१८ च्या रात्री प्रकाश कामावर जाण्यासाठी सायकलीने घराबाहेर पडले. तेव्हा आई व पत्नीस त्रास देण्याच्या कारणावरुन मुलगा ज्ञानेश्वर याने धारदार शस्त्राने प्रकाशची हत्या केली. तसेच रक्ताने माखलेले कपडे पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा… कंटेनर थेट हाॅटेलमध्ये; शिरपूर तालुक्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू
या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्या व पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करून ज्ञानेश्वरला अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश एस.यू. बघेले यांच्या न्यायालयासमोर पार पडली. न्यायालयाने ज्ञानेश्वर बोरसेला जन्मठेप व दोन लाखाच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक वर्ष कारावास भोगावा लागेल असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड.अनिल बागले यांनी युक्तिवाद केला. तत्कालिन पोलीस अधीक्षक अजित हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. पी. कोलते यांनी या संदर्भातील तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.