लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: जिल्ह्यात करोना पुन्हा पसरु लागल्याने शहरात दोन दिवसात करोना केंद्र उभारावे, या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. युवासेनेचे जिल्हाप्रमुख हरीष माळी यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. करोनाच्या मागील लाटेत जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. आजारावरील औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते.

जिल्हा रुग्णालयात पुरेशा रुग्णशय्या उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर करोनाला प्रतिबंध करण्यासाठी धुळे जिल्ह्यात तूर्तास एक केंद्र उभारून लसीकरण, उपचार अशा सर्व सुविधा पुनःश्च सुरू कराव्यात, अशी मागणी माळी यांनी केली आहे.

हेही वाचा… धुळे: वाहतूक पोलीस लाच घेतांना जाळ्यात

अनेक भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांना करोनासदृश लक्षणे दिसत असून शहरात करोना केंद्र नसल्याने खासगी रुग्णालयांत तपासणी करावी लागत आहे. यामुळे मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातील नागरिकांचे हाल होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशासनास निवेदन देतांना माळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, मनोज जाधव, धुळे ग्रामीण तालुकाप्रमुख गणेश चौधरी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuva sena protest for corona center in dhule dvr