ग्रामीण भागात अत्याधुनिक शिक्षणाच्या सुविधा तशा तुरळकच. मात्र आहे त्या परिस्थितीत मार्ग काढत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कळवण तालुक्यातील पाटविहीर शाळेचे रूप बदलले. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास डोळ्यांसमोर ठेवत केलेल्या उपक्रमांची फलश्रुती पाहता शिक्षण विभागाच्या या भगीरथ प्रयत्नांची दखल घेत त्यांना सलग चौथ्या वर्षी शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘आयएसओ’ नामांकन जाहीर झाले आहे.
आजही खेडय़ातील शाळा आणि शिक्षण म्हटले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. तेथील भौगोलिक, सामाजिक परिस्थिती पाहता शिक्षणाला मिळणारा प्राधान्यक्रम सर्वज्ञात आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाटविहीर येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक जिभाऊ निकम यांच्या सहकार्याने विविध उपक्रमांची आखणी केली. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हे उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवत स्वयंअध्ययन, १२ तास शाळा, शाळेत संगणक यंत्रणा, विविध संदर्भग्रंथांनी उपयुक्त असे ग्रंथालय, योग शिक्षण, प्रत्यक्ष भेट यासारख्या उपक्रमांची आखणी केली. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल, विद्यार्थी-शिक्षक संवाद साधला जाईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुस्तकी सल्ल्यापेक्षा विद्यार्थ्यांना काय वाटते, याला महत्त्व दिल्याने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाचे महत्त्व पटले आहे.
‘स्व-संवाद’ लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्यावर परिपाठाआधी तसेच शाळा सुटल्यानंतर १५ मिनिटे ‘आणापान’ म्हणजे मौन ठेवण्यात येते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची कल्पकता या मिलाफाने शालेय स्तरावरील विविध प्रदर्शनांमध्ये अनोख्या प्रतिकृती समोर आल्या आहेत. बदलत्या काळाची पावले ओळखत विद्यालयात ‘ई-लर्निग’ व्यवस्था करण्यात आली आहे, हे विशेष.
योगाचे महत्त्व जाणत प्रत्येक शनिवारी खास एक तास विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतो. प्रत्यक्ष क्षेत्र भेटीच्या माध्यमातून कृषी ते सहकार, राजकारण ते समाजकारण अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांचा मुक्तसंचार राहिल्याने प्रत्यक्ष कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यांना समजले. यामुळे संसद भवनची क्षेत्रभेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर एक मंत्रिमंडळ उभारत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना नि:संकोच बोलता यावे, यासाठी ‘तक्रार पेटी’ची संकल्पना समोर आली. त्यातून विद्यार्थी आणि शिक्षक संवाद दृढ होत गेला. शाळेच्या या उपक्रमांची दखल घेत शैक्षणिक गुणवत्तेसाठी आयएसओ नामांकनासाठी शाळा जिल्हा स्तरावर दोनदा पहिली आली. तालुक्यात सलग चार वर्षे पहिली राहिली आहे. शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत त्यात वेगवेगळे प्रयोग करणारी ही शाळा सर्वासाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.

Story img Loader