निफाडमधील ४२ शाळांमध्ये हसत खेळत शिक्षण
शाळेला चढविलेला नवीन साज..वर्गाच्या आरेखित भिंत आणि फरशांवर हसत खेळत चाललेला अभ्यास..शब्द, चित्र कार्ड व प्रतीकांचा कल्पकतेने वापर.. खेळातून शिक्षण देण्याकरिता शिक्षकांची धडपड..
निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ शाळांमधील हे आशादायी चित्र. ज्ञानरचनावादी पद्धतीमुळे तीन महिन्यांत या शाळांमधील स्थिती पूर्णपणे पालटली असून आनंददायी वातावरणात अध्ययन होत असल्याने गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये मैत्री व सहकार्याची भावना वृद्धिंगत केली. शिवाय, गतिमंद बालकेही वर्गात बोलू लागली आहेत. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत निफाड तालुक्यातील ज्ञानरचनावादी शाळांमधील या बदलांचा अभ्यास जानेवारीपासून राज्यातील इतर शाळांचे शिक्षक करणार आहेत.
अध्यापनात विशिष्ट प्रक्रिया राबविल्यास शाळेतील सर्व मुले शिकण्यास उद्युक्त होतात, हे निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उपरोक्त शाळांनी दाखवून दिले आहे. नव्या निकषानुसार राज्यातील सर्व शाळा प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून वर्तनवाद अध्यापन पद्धतीऐवजी ज्ञानरचनावादी अर्थात कृतीतून अध्यापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यात या उपक्रमाची निफाड तालुक्यातून मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तीन महिन्यांत त्याचे सकारात्मक परिणाम दृिष्टपथास आल्याने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दीड हजार शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गुणवत्ता वाढ आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रगत शैक्षणिक कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत शिक्षकांना रचनावादी शाळांचा अभ्यास दौरा घडवून खास प्रशिक्षण दिले जाते. निफाड तालुक्यातील शिक्षकांनी सातारा जिल्ह्यातील या स्वरूपाच्या शाळांची पाहणी केल्यानंतर त्याची आपआपल्या शाळेत अंमलबजावणी केली. आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्यासाठी शाळेची भिंत व फरशी रंगवून आवश्यक ते शिक्षण साहित्य तयार करण्यात आले. त्यात शब्दकोडे, शब्दांचा डोंगर व शब्दचक्र, वेगवेगळी प्रतिके आदींचा समावेश आहे. कोणताही विद्यार्थी िभत वा फरशीवर लेखन करू शकतो. वर्गात कुठेही बसण्याची अथवा वर्गाबाहेर जाऊन अभ्यासाची त्यांना मुभा आहे. गणिताचा किचकट विषय फळ्याऐवजी नाणी व नोटांच्या मदतीने खेळातून समजावून दिला जातो. शिक्षकही फरशीवर बसून मार्गदर्शक व निरीक्षकाची भूमिका बजावत असल्याचे विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे यांनी सांगितले.
निफाड तालुक्यात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तालुकानिहाय १०० अशा जिल्हा परिषदेच्या एकूण दीड हजार प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी नमूद केले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत उपलब्ध निधी शाळांची रंगरंगोटी व इतर शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी वापरला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ३३४८ शाळा असून त्यात दोन लाख ९६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या ठिकाणी १२ हजार ६३८ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने रचनात्मक शाळांच्या दौऱ्यावर पाठविले जात असल्याचे मोगल यांनी सांगितले. प्रशिक्षणानंतर दोन महिन्यांनी त्या त्या शिक्षकांचे वर्ग आणि पर्यायाने शाळा १०० टक्के प्रगत दिसेल, अशी अपेक्षा आहे. गळती शून्यावर आणण्यासाठी शिक्षण आनंददायी करणारा हा उपक्रम निफाड तालुक्यात यशस्वी झाला असून पुढील काळात राज्यभरातील हजारो शिक्षक या शाळांचा अभ्यास करणार आहेत.

प्रगत शाळा कोणती?
प्रगत शाळेची परिभाषा बदलण्यात आली आहे. विविध चाचण्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तरी ते विद्यार्थी प्रगत समजले जाणार नाहीत. आता ज्या वर्गात आणि ज्या शाळेतील १०० टक्के मुलांनी १०० टक्के क्षमता संपादन केली असेल, तीच शाळा अथवा तेच वर्ग प्रगत मानले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यात यश
निफाड तालुक्यातील ४२ शाळांमध्ये तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने विद्यार्थी शाळेकडे आकर्षित झाले आहेत. त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले. वर्गाच्या भिंती व फरशांवर शब्दकोडे, शब्द डोंगर, शब्दचक्र आदींचे आरेखन करण्यात आले. प्रतीकांचा वापर केला जातो. यामुळे विद्यार्थी हसत खेळत शिक्षण घेतात. खेळातून शिक्षण, कृतीतून आनंद, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य व मैत्रीभाव वृद्धिंगत होण्यास मदत मिळाली. गतिमंद विद्यार्थीदेखील वर्गात बोलू लागले आहेत.
-डॉ. डॉ. नेहा शिरोरे,
(विस्तार अधिकारी, पंचायत समिती, निफाड)

 

Story img Loader