नाटक म्हणजे आपल्याला सवय असते ती आपल्यासमोर रंगमंचावर एक धागा पकडून पुढे चालणारी एकच एक गोष्ट बघण्याची. पण ‘कुछ मीठा हो जाए’ या नाटकाने एकाच नाटकात वेगवेगळी कथानकं एकत्र गुंफण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.
तळपत्या उन्हातून आल्यावर एसीची गार हवा आणि नाटय़गृहातला एक टिपिकल वास. कुई कुई आवाज करणाऱ्या खुच्र्या आणि समोर भला मोठा रंगमंच; पण पडद्याने झाकलेला. आतून फक्त हातोडी ठोकण्याचा आणि ‘अरे ए…ते इथे ठेव’, ‘बाळू स्पॉट दे रे,’ असे नाना प्रकारचे आवाज. सगळ्या प्रेक्षकांचं घडय़ाळाकडे लक्ष. पहिली बेल होते. लोकांमध्ये चर्चा नक्की कितवी बेल? पटकन वर लक्ष. सगळे दिवे चालू. म्हणजे पहिलीच याची खात्री. पुन्हा सगळ्यामध्ये कुजबुज. आता स्टेजवरच्या आवाजात वाढ आणि प्रेक्षकात काही ऐकू जाऊ नये हा प्रयत्न. इतक्यात एक माणूस पडद्याच्या खालून डोकं वर काढतो आणि म्यूझिक ऑपरेटरला सूचना द्यायला लागतो. सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष त्या माणसाकडे. काही मिनिटांमध्ये तो माणूस दिसेनासा होतो आणि दुसरी बेल. प्रेक्षागृहातले ‘काही’ लाइट्स बंद. प्रेक्षकांचा सुस्कारा. शेजारच्या आजींची चर्चा ऐन रंगात. त्यांनी ‘तीच’ साडी आज ‘याच’ नाटकाला का नेसली याचं एक्स्प्लनेशन. पडद्याची हालचाल आणि तिसरी बेल. सगळे लाइट्स बंद. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला. शेजारच्या आजी गप्प. मोबाइल फोन्स बंद करण्याची सूचना. अंधारात पुन्हा सगळ्यांच्या मोबाइलच्या लाइट्सचा उजेड आणि तितक्यात कुणाचं तरी बाळ रडतं. बाळाचे बाबा बाळाला उचलून बाहेर घेऊन जातायत आणि ‘रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून’ असा धीरगंभीर आवाज प्रेक्षागृहात घुमतो आहे. प्रेक्षकांची ‘आवाज कुणाचा’ यावर कुजबुज. तितक्यात स्वतच्या आवाजात व्हेरिएशन्स आणून नाटकाच्या नावाची घोषणा. टाळ्यांची आतषबाजी. यात नाटक एकदाचं सुरू झालं, ‘बरं झालं बाई हीच साडी नेसले’पासून ‘आवाज कुणाचा’ हे कळल्यापर्यंतचा सगळा आनंद समाविष्ट असतो. त्या टाळ्या संपायच्या आत पडदा उघडतो. रंगमंचावरचा प्रकाश हळू हळू गडद होत जातो. रंगमंचावरचा सेट बघून आपलं घरही असंच असावं याचा विचार आणि कलाकाराची एन्ट्री.
आपली रंगदेवता जशी कलाकारांच्या बाबतीत श्रीमंत तशीच नाटकाच्या आशय-विषयाबद्दलसुद्धा. अगदी सुरुवातीच्या काळापासून आपली रंगभूमी प्रयोगशील. रंगभूमीच्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात असे असंख्य प्रयोग झाले आणि ते तिने आपलेही मानून घेतले. असाच एक नवखा प्रयोग सध्या रंगभूमीवर चालू आहे आणि तो म्हणजे ‘कुछ मीठा हो जाए’ पाच लेखक (अंबर हडप, गणेश पंडित, अभिजीत गुरू, शिरीष लाटकर, आशीष पाथरे) आणि एक दिग्दर्शक (गणेश पंडित) अशी आगळीवेगळी संकल्पना अथर्व थिएटर्स ‘कुछ मीठा हो जाए’च्या रूपाने आपल्या समोर घेऊन आलं आहे. प्रेम हा विषय रंगभूमीला परका नाही. जशी माणसाने प्रेमाची वेगवेगळी रूपं अनुभवली तशीच ती रंगभूमीनेही अनुभवली. या नाटकातसुद्धा चार वेगवेगळ्या लेखकांच्या लेखणीतून चार कथा साकार झालेल्या असल्या तरीही त्यांना जोडणारा एकच धागा आहे आणि तो म्हणजे प्रेम. प्रेम ही एक अशी भावना जी आपल्याला दिसत नाही, पण एकमेकांना आपल्याच नकळत सहज बांधून ठेवते. या नाटकाचंही हेच वेगळेपण आहे. एकतर प्रेम हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. त्यावर कितीही प्रबंध लिहिले गेले, तो विषय आपण कितीही कोळून प्यायला असला तरीही तो ताजातवानाच वाटतो. हेच नेमकं लेखकांनी हेरलं.
नाटकातील पहिली कथा आहे एका नवविवाहित दाम्पत्याची. लग्नाची पहिली रात्र आणि दोघंही सरभरीत अवस्थेत. अशाच अवस्थेत त्यांना त्यांच्या प्रेमाचा धागा कसा गवसतो आणि त्यांच्या नात्यातली गम्मत कशी रंगत जाते अशी त्याची गणेश पंडित याच्या लेखणीतून साकार झालेली कथा.
लेखक अंबर हडप एक लेखक म्हणून या नाटकाकडे बघताना म्हणतो की आपल्या आयुष्यात दोन गोष्टी अशा असतात ज्या आमंत्रण न देता येतात त्या म्हणजे प्रेम आणि मृत्यू. त्यातली मृत्यू ही भयावह गोष्ट आहे आणि प्रेम म्हणजे फारच सुंदर गोष्ट आहे, पण तेव्हाच जेव्हा प्रेमाचा नेमका क्षण माणूस पकडतो आणि त्याचा आनंद घेतो. तोच एक क्षण या नाटकाने पकडला आहे असं त्याला वाटतं आणि तो एक क्षण वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसा अनुभवला जाऊ शकतो याचा जेव्हा विचार केला तेव्हा त्या क्षणाच्या कथा झाल्या आणि त्या कथांचं नाटक झालं. अंबर हडप यांची कथा उपासना, मानव आणि मानवची बहीण चिंगी या तीन पात्रांभोवती फिरते ज्यातून लेखक प्रेमाला वयाचं बंधन नाही हे अभिजीत चव्हाण (मानव), पौर्णिमा तळवलकर (उपासना) आणि केतकी चितळे (चिंगी) या पात्रांमधून फुलवतो.
तिसऱ्या कथेत कुमार (चिन्मय उद्गीरकर) हे पुण्यातलं टिपिकल पात्र. आपण देश आणि मुके प्राणी सोडून कुणावरच प्रेम करणार नाही अशी प्रतिज्ञा तो करीत असतो आणि त्यातच त्याला व्हॅलेंटाइन नावाचा एक गुरू भेटतो आणि त्याला प्रेमाच्या चष्म्याने जग बघायला भाग पाडतो. चष्मा लावल्यावर काय काय घडतं याचं सुंदर चित्रण लेखकाने कथेत केलेलं आहे. पाहिलं प्रेम हे आपल्याला मॅनर्स आणि कुणावर प्रेम करायचं हे शिकवतं आणि म्हणून एकदा तरी प्रेमात पडलंच पाहिजे हे एका वेगळ्याच लहेजातून या कथेद्वारा आपल्यासमोर येतं.
नंतरची कथा ही अभिजीत गुरू याने लिहिलेली एक अद्भुत फँटसी आहे. अॅरेंज मॅरेज झालेलं एक जोडपं आपण दोन वर्षांत एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहोत आणि एकमेकांना पूरक झालेलो आहोत असा विचार करून ते दोनाचे तीन हात करण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी समुपदेशकाकडे जातात. समुपदेशक त्यांना ते आई-बाबा होण्यासाठी लायक आहे आहेत का बघण्यासाठी म्हणून एक इलेक्ट्रॉनिक बाळ देतात आणि ते यांत्रिक बाळ त्यांच्या प्रेमाचा नेमका क्षण गवसायला कसं कारणीभूत ठरतं हे या एका वेगळ्याच धाटणीच्या कथेतून लेखक मांडतो.
शेवटची कथा सगळ्या गोडावर चरचरीत फोडणी आहे. भांडणातून गवसलेलं प्रेम लेखक आशीष पाथरे या कथेतून सांगतो. दोन भिन्न माणसं एकत्र आली की विचारांच्या गर्दीमुळे भांडणं ही होणारच; पण आपले इगो बाजूला ठेवून एकमेकांसाठी जगणं हे लेखक एका वेगळ्याच कल्पनाविष्कारातून दाखवतो.
कलाकार अभिजीत चव्हाण, पौर्णिमा तळवलकर, चिन्मय उद्गीरकर, केतकी काळे यांनीही लेखकांच्या कथेला आपल्या अभिनयाने पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे; पण तरीही अभिजीत चव्हाण आणि पौर्णिमा तळवलकर यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाचा लवकर ठाव घेतो. एक दिग्दर्शक म्हणून गणेश पंडित म्हणतो, ‘‘सगळ्या कथांचा वेगळेपणा टिकवण्याचं एक आव्हान माझ्याकडे होतं. मुळात ही संकल्पना या नाटकाची सहनिर्माती मोनिका धारणकर हिची. आम्ही ठरवून वेगवेगळ्या कथा लिहिल्या नाहीत. एक विषय ठरवला आणि प्रत्येक कथेत एक वेगळा फ्लेवर आणायचा प्रयत्न केला. आम्ही पाचही जणांनी असं ठरवलं होतं की, या कथा आधी कुणीच कुणाला वाचून दाखवायच्या नाहीत. जेव्हा सगळ्यांच्या लिहून झाल्या तेव्हा आम्ही एकत्र भेटलो आणि आमच्या कथा वाचल्या. आम्हाला जे हवं होतं ते नकळत साधलं गेलं आणि मग या सगळ्या कथा एकत्र करून त्याचं नाटक होऊ शकतं हे त्या दिवशी कळलं. मी लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही बनून ही प्रोसेस खूप एन्जॉय करतोय. प्रत्येक लेखकाचं एक वैशिष्टय़ आहे. ते जपण्याचा मी प्रयत्न केलाय आणि काही अंशी तो यशस्वीसुद्धा झाला आहे. शेवटी हे प्रायोगिक नाटक आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण टीमचा हा एक प्रयोग आहे.’’
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांच्याच प्रमाणे नाटकाचा नेपथ्यकार विशाल नवाथे, संगीतकार समीहन, प्रकाशयोजनाकार भूषण देसाई, नृत्य दिग्दíशका दीपाली विचारे यांच्यामुळे नाटक जिवंत झालंय. नाटकाचं नेपथ्य अतिशय सूचक आहे, संगीत आणि नृत्य यांचा मेळ प्रेक्षकांना झुलवत ठेवतो आणि प्रकाशयोजना भूमिका आणखीन गडद करते.
एकंदर नाटकाचा अनुभव हा शृंगाररसाचा खजिना आहे. योग्य प्रमाणात योग्य वेळी दिग्दर्शकाने तो रस पत्रात ओतलेला आहे आणि पात्रांनी सहज तो रसिकांपर्यंत पोहोचवलेला आहे.
‘तेरी हर एक अदा पे इश्क
सुफिया हो जाए,
मेरे यादों में हमेशा तेरा ही नाम आ जाए
रो मत ए पगली..
चलो कुछ मीठा हो जाए’
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com