|| पूनम सकपाळ

वार्षिक उलाढाल २५० कोटींपर्यंत; आंबा बागायतदारांना फटका

नवी मुंबई : हवामान बदलाचा यावर्षी हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वाशीतील एपीएमसी फळ बाजारात एप्रिल ते मे महिन्यात दरवर्षी हापूसची आवक होत ४०० ते ५०० कोटींची उलाढाल होत असते. यावर्षी यात निम्म्याने घट आली असून २०० ते २५० कोटींचीच उलाढाल झाली आहे. तर दरवर्षीच्या तुलनेत आवकही ५० ते ६० टक्के घटली आहे.

वारंवार झालेला अवकाळी पाऊस आणि शेवटच्या टप्प्यातील झालेले तौक्ते वादळाचा मोटा फटका आंबा बागायतदारांना यावर्षी बसला आहे.  गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने आंबा उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना होती. मात्र मोहर लागण्याच्या काळातच अवकाळी पाऊस झाला. त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. उत्पादन कमी झालेच शिवाय हापूसचा दर्जाही खालावला होता. त्यामुळे बाजारात यावर्षी आवक कमी होत होती. त्यानंतर तौक्ते वादळ, हवामान बदल यामुळे हापूसला कीड लागली. ही संकटे दूर होत नाहीत तोच तुडतुडा रोगामुळे आंबे देठाशी काळवंडण्याचे प्रकार वाढले. याचाही परिणाम बाजारावर झाला. उत्पादन कमी आल्याने हंगामात सातत्यता नव्हती. १५ एप्रिलनंतरही बाजारात आवक कमी होती. रत्नागिरी, जुन्नर हापूसचा हंगाम १० ते १५ जूनपर्यंत असतो. मात्र अवकाळी, वादळी पावसाने झाडावरचे आंबे गळून पडले. झाडावर शिल्लक राहिलेला ५ टक्के आंबाही खराब निघाला. त्यामुळे हंगाम १५ ते २० दिवस आधीच संपला. दरवर्षी ८० हजार ते १ लाख आंबा पेटी होत असते. मात्र यंदा ही आवक निम्म्यावर आली. हंगामात ४०० ते ५००कोटी होणारी उलाढाल यावर्षी २०० ते २५०कोटींपर्यंत झाली असे व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.

रायगडमधील बागायतदारांना फटका

अवकाळी पावसाने रायगडमधील हापूसचे उत्पादन घटले आणि हापूस बाजारात उशिरा दाखल झाला. त्यामुळे ५० ते ५५ होणारी उलाढाल २० ते २५ कोटींपर्यंतच गेली, अशी माहिती महाराष्ट्र आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.

आवक घटली

अवकाळी पाऊस, हवामान बदलाचा फटका हापूसच्या उत्पादनावर यावर्षी मोठा परिणाम झाला. सन २०१८-१९ मध्ये १३,१८,६८५ क्विंटल तर सन २०१९-२०मध्ये ११,५६,६२३ क्विंटल आवक होती. ती यावर्षी फक्त ५,९०,०२२ क्विंटल आवक झाली आहे.