आतापर्यंत ७० रुग्ण; दाट लोकवस्ती असल्याने संसर्गाची चिंता

नवी मुंबई : मुंबईनंतर ठाणे जिल्ह्य़ात ठाणे शहर व नवी मुंबईत करोना रुग्णांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या ३४८ पर्यंत गेली असून त्यातील ७० रुग्ण हे एकटय़ा कोपरखरणे विभागातील आहेत. त्यामुळे हा परिसर करोनाचा हॉटस्पॉट होत असून या ठिकाणी दाट लोकवस्ती असल्याने संसर्गाचा धोका अधिक असल्याने चिंता आहे.

नवी मुंबईत करोनाचा पहिला संसर्ग हा फिलीपाईन्स येथून वाशी येथील मशिदीमध्ये आलेल्या नागरिकांपासून सुरू झाला आणि आजपर्यंत करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरातील सर्वच विभागात करोनाचे रुग्ण सापडत आहेत.

शहरात सोमवापर्यंत ३१४ करोना रुग्ण सापडले आहेत. यात कोपरखैरणे ७०, वाशी ५४, नेरुळ ५४, तुर्भे ५१, बेलापूर ३४, घणसोली ३८, ऐरोली २७, दिघा २० रुग्ण आहेत.

नवी मुंबईत सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत करोनाचा शिरकाव झाला असून त्या ठिकाणीही आतापर्यंत ४० करोना संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत. येथील व्यापारी, माथाडी वर्गाला करोनाचा संसर्ग झाला आहे.

हा वर्ग नवी मुंबईतील कोपरखरणे येथे असलेल्या माथाडी वसाहतीत मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास असल्याने एपीएमसी बाजारातील करोना संसर्ग कोपरखरणेत मोठय़ा प्रमाणात पसरू लागला आहे. त्यामुळे कौपरखरणोतील करोना रुग्णांचा आकडा ७० पर्यंत गेला आहे. त्यात हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी करानाचा प्रादुर्भाव रोखणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.

‘एपीएमसी’वर लक्ष

एपीएमसीत रविवापर्यंत ४० करोनाचे रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गर्दीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाण्यातून मोठय़ा प्रमाणात खरेदीदार या ठिकाणी येत असल्याने येथे करोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता एपीएमसीवर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी एपीएमसी व महापालिका प्रशासनाने एकूण ४ हजार जणांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यातील संशयित ५९ जणांची करोना चाचणी केली आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल येणे अद्याप बाकी आहे. हे वैद्यकीय अहवाल सकारात्मक आले तर त्यांच्या संपकरातीलही अनेक जणांना शोधून येथून करोना संसर्ग आटोक्यात आणणे मोठे आव्हान असणार आहे.

Story img Loader