महापालिकेचा निर्णय
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून आहे. मात्र यात नवी मुंबईत राहणाऱ्या परंतु अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई व इतर शहरात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातून संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने हे स्थलांतर थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर परिसरांतून कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नवी मुंबईतच राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
नवी मुंबई शहरात राहणारे परंतु मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नवी मुंबईत करोनाबाधित रुग्ण वाढण्याचे प्रमाण हे मुंबई संपर्कातून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री व मुंबईचे आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे हे स्थलांतर थांब्विण्याची मागणी केली आहे. ही मागणी करीत असताना नवी मुंबई महापालिकेने स्वत: यासाठी पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई येणाऱ्या अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी महापालिका आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. नवी मुंबई महापालिकेत स्थायी कर्माचारी २ हजार ५०० असून कंत्राटी पद्धतीवर मोठय़ा प्रमाणात कर्मचारी आहेत. पालिका क्षेत्राबाहेरून नवी मुंबई शहरात येणाऱ्यांची संख्या जवळजवळ ५ टक्के आहे. याबाबतची माहिती प्रत्येक विभागप्रमुखांकडून घेतली आहे.
नवी मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेत काम करणारे व नवी मुंबई शहराबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती काढण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. विभागप्रमुखांमार्फतच या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश विभागप्रमुखांना केले आहेत.
– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त