आठवडाभरात २०३ नव्या रुग्णांची नोंद; अवघ्या १२ दिवसांत रुग्णसंख्या शंभरवरून चारशेवर
आसिफ बागवान-संतोष जाधव, लोकसत्ता
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या आठवडाभरात दोनशेने वाढली असून अवघ्या १२ दिवसांत शहरात तीनशे रुग्णांची नोंद झाली आहे. २४ एप्रिलपासून शहरातील रुग्ण दुपटीचा (डबलिंग रेट) वेग सरासरी सहा दिवसांवर आला आहे. शहरातील ५१ टक्क्यांहून अधिक रुग्ण २१ ते ४० या वयोगटातील असल्याचेही पालिकेच्या आकडेवारीवरून निष्पन्न होत आहे.
नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च रोजी आढळून आला होता. वाशी येथील मशिदीमध्ये मुक्काम केलेल्या एका फिलीपिनी नागरिकाला करोनाची बाधा झाल्यानंतर या मशिदीशी संबंधित मौलवी व त्यांच्या कुटुंबीयांनाही या आजाराची बाधा झाली. असे असले तरी, शहरातील रुग्णसंख्या दहावर पोहोचण्यास ३१ मार्च उजाडले. त्यामुळे नवी मुंबईत करोनाची साथ नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात होता. १३ एप्रिल रोजी करोनााबाधितांची संख्या ५० वर पोहोचली तर त्यानंतर १० दिवसांनी हा आकडा शंभरपार पोहोचला. यावरून सुरुवातीच्या काळात नवी मुंबईतील रुग्ण दुपटीचा वेग सरासरी दहा ते अकरा दिवस होता, हे दिसून येते. परंतु २४ एप्रिलपासून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २४ एप्रिल रोजी १०३ असलेला रुग्णांचा आकडा २९ एप्रिल रोजी २०६वर पोहोचला तर त्यानंतरच्या सहा दिवसांत रुग्णसंख्या ३९५वर पोहोचली. त्यामुळे सध्या दर सहा दिवसांनी एकूण रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे दिसून येत आहे.
पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही याला दुजोरा देत रुग्णवाढीविषयी चिंता व्यक्त केली. ‘ही चिंतेची बाब असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये व पालिकेला सहकार्य करावे. मुंबईत कामाला जाणाऱ्या नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे,’ असे ते म्हणाले.
एपीएमसी धोकादायक
गेल्या दहा दिवसांत नवी मुंबईत वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काम करणारे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. बाजार समितीतील मंडयांमध्ये करोनाचा वाढता प्रसार चिंताजनक ठरत असून बाजारपेठ काही दिवस बंद करण्याची मागणीही जोर धरत आहे. मात्र, एपीएमसी बंद केल्यास जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होईल, अशी भीती पसरवून याबाबतचा निर्णय रोखण्यात येत असल्याची चर्चा आहे.
चाचण्यांतही लक्षणीय वाढ
महाराष्ट्रात साधारण दहा दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत असताना नवी मुंबईत अतिशय वेगाने रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रुग्णसंख्येत अचानक वाढ होण्यामागे वाढलेल्या चाचण्यांचे प्रमाणही असल्याचे दिसून येत आहे. १४ एप्रिल रोजी पालिकेने ३७६ चाचण्या केल्या होत्या. त्यातून ५० जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर २९ एप्रिलपर्यंत चाचण्यांची संख्या २८७८वर गेली. पालिकेने ५ मेपर्यंत ४७०२ चाचण्या केल्या असून त्यातून ३९५ रुग्णांचा छडा लागला. यापैकी मंगळवापर्यंत केलेल्या ११२६ चाचण्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.