कार्यालयांसाठीच्या जागेत मद्यविक्री, पानटपरी, खाद्यपदार्थाची दुकाने; सिडकोकडून नोटिसा

सिडकोकडून कार्यालयासाठी रेल्वेस्थानकातील गाळा घ्यायचा आणि त्यात मद्यविक्री, पानटपरी, उपाहारगृह थाटायचे, असे प्रकार नवी मुंबईतील जवळपास सर्वच रेल्वेस्थानकांत करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या वापरबदलाविरोधात सिडकोने आता कारवाईचे शस्त्र उगारले आहे.

नवी मुंबईत भव्य आणि देखणी रेल्वे स्थानके उभारण्यात आली आहेत. या स्थानकांत फेरीवाल्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मात्र सिडकोने विक्री केलेल्या तसेच भाडेकरारावर दिलेल्या गाळ्यांचा मनमानी पद्धतीने वापर केला जात आहे. एकूण १० स्थानकांतील गाळे विकण्यात आणि भाडय़ाने देण्यात आले आहेत. गाळ्यांच्या गैरवापराबाबत सिडकोचा अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत असताना सिडकोच्याच महिला विकास अधिकारी शोभा मस्तुद यांनी मात्र याविरोधात आवाज उठवला आहे.

हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली ते खांदेश्वरदरम्यानच्या दुकानांच्या वापरातील बदलावर कारवाई करण्यासाठी सिडको सरसावली आहे. सिडकोने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकांतील गाळ्यांचा कोणकोणत्या स्वरूपाचा वापर करू नये, याची नियमावली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करून कार्यालयासाठी दुकान घेतल्याचे दर्शवून त्यात मद्यविक्री दुकान, बार, हॉटेल्स थाटण्यात आली आहेत. सिडकोने नवी मुंबई शहरातील घणसोली, ऐरोली, तुर्भे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, खांदेश्वर, खारघर या स्थानकांत व्यावसायिक गाळे तसेच किऑस्क तयार केले आहेत. १९९७-९८पासून हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. काही गाळ्यांची विक्री करण्यात आली आहे. सिडकोने भाडेतत्त्वावर दिलेले गाळे हे बहुतांश तळमजला वगळून दिलेले आहेत; परंतु तळमजल्यावरील अनेक व्यावसायिकांनी दुकानाबाहेरचा परिसर आपलाच समजून वापर सुरू केला आहे.

मुळात सिडकोच्या करारनाम्यात गाळ्यांची जागा निश्चित दर्शवली आहे. दिलेल्या जागेबाहेर कोणतेही अतिक्रमण करण्यास तसेच बाहेरची जागा वापरण्यास बंदी घातली आहे. ज्या कारणासाठी गाळा विकला आहे, त्या कारणात बदल करायचा असल्यास, जागेतील वापराच्या बदलासाठी सिडकोची परवानगी आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तरीही बहुतेक व्यावसायिकांनी सिडकोचे नियम धाब्यावर बसवत वापर-बदल केला आहे. अपंग व्यक्तींनीही अपंगाच्या नावे घेतलेल्या गाळ्यांमध्ये पाच-पाच विविध व्यवसाय थाटले आहेत. या सर्व व्यवसायांना आतील जागा अपुरी पडत असल्यामुळे ते रेल्वे प्रवाशांचा मार्ग अडवत आहेत. खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांनी गाळ्याबाहेर टेबल-खुच्र्या टाकून स्थानकातील जागा गिळंकृत केली आहे.

या व्यवसायांवर बंदी

मद्य, मांस, मासेविक्री, उपाहारगृहे, पानटपरी, भंगारविक्री, बांधकाम हार्डवेअर शॉप, ऑटो वर्कशॉप, प्रिंटिंग प्रेस, सिमेंटविक्री, धूळ निर्माण होईल असे उद्योग, फर्निचर बनवणे व स्टील फॅब्रिकेशन, रासायनिक प्रयोगशाळा, पिठाची चक्की सिडकोने १९९७-९८ पासून रेल्वेस्थानकातील व्यावसायिक गाळे विकले आहेत. काही गाळे व्यावसायिकांना आणि काही जागा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना भाडय़ाने दिल्या आहेत; परंतु स्थानकाच्या तळमजल्यांवरील व्यावसायिकांनी सिडकोकडे नमूद असलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी गाळेवापर सुरू केला आहे. सानपाडा स्थानकातील हॉटेल व बार तसेच नेरुळ स्थानकातील बारला नोटिसा बजावल्या आहेत. नेरुळ स्थानकातील मद्यविक्री व्यावसायिकाला टर्मिनेशनची नोटीस बजावली आहे. वाशीतील सनी बारचा परवानाच रद्द केला आहे. स्थानकात सर्रास खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

शोभा मस्तुद, महिला विकास अधिकारी, सिडको

सिडकोच्या किऑस्कमध्ये बाहेर पाच व्यवसाय सुरू असून त्या पाच जणांकडून १० ते १५ हजार रुपये भाडे घेतले जात आहे. सिडकोने अधिक कडक भूमिका घ्यावी आणि बेकायदा व्यवसायांना चाप लावावा.

वैभव सावंत, वाशी

नवी मुंबईतील अनेक गाळ्यांमध्ये नियमबाह्य़ व्यवसाय सुरू आहेत. त्याला व्यावसायिक व अधिकारीही जबाबदार आहेत. त्यांच्यावर सिडकोने कडक कारवाई करावी.

श्रीकांत माने, मनसे पदाधिकारी