नवी मुंबई : नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या चारशेच्या वर गेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने करोना रुग्णांवर उपचारासाठी इतर ठिकाणीही नियोजन केले आहे. पालिकेच्या वाशी करोना रुग्णालयाबरोबरच घणसोली येथे १२०, नेरुळ येथे १००, वाशीतील प्रदर्शनी केंद्रात १२०० अशा १४२० खाटांची सुविधा केली आहे.
वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात ‘कोव्हीड केअर सेंटर’ सुरू करण्याच्या अनुषंगाने आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील व उपआयुक्त अमरिश पटनिगिरे यांच्यासह पाहणी करीत आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्या ठिकाणी १२०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून दोन स्वतंत्र कक्ष असणार आहेत. या ठिकाणी त्वरित स्नानगृहे व स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले. त्याचप्रमाणे घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आय.टी. पार्कमध्ये मेडिकल अॅण्ड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर या ठिकाणीही १२० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून यात ६० खाटा या पालिकेसाठी राखीव असणार आहेत. त्याचप्रमाणे नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये १०० खाटांचा करोना कक्ष उभारण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
कोणताही रुग्ण वैद्यकीय उपचारांशिवाय राहू नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने निर्णय घेतले जात असून त्याच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले जात आहे.
अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त