करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत मनपाने आयोजित केलेल्या करोना आरोग्य तपासणी शिबिरात, सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढली, मनपा अधिकाऱ्यांनी नागरिकांना तपासणी करा म्हणून आर्जव केली. मात्र त्या प्रमाणात नागरिकांकडून तपासणीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. वास्तविक नागरिकांनीही या तपासणी शिबिरात उत्स्फुर्तता दाखवणे अपेक्षित आहे.
नवी मुंबईत सर्वाधिक करोना प्रसार कोपरखैराणे आणि तुर्भे परिसरात होत असून, तो रोखण्यासाठी युद्धपातळीवर जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याचे काम मनपाने सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कोपरखैराणे आणि तुर्भे येथे प्रत्येकी तीन शिबिरांचे आयोजन केले आहे. हे तिन्ही शिबीर ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे (कंटेन मेन्ट झोन) अशा ठिकाणी होत आहेत. कोपरखैराणे येथेही सेक्टर १५,१६ व १७ या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याने सर्वांना सोयीचे पडेल म्हणून सेक्टर १५ येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यालयात दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मंगळवारी २५० पेक्षा जास्त तर बुधवारी ३५० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. मात्र रुग्ण संख्येच्या तुलनेत ही अपेक्षित संख्या नसल्याची खंत काही अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केली. मंगळवारचा अनुभव पाहता बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांनी अक्षरशः रस्त्याने ये जा करणाऱ्यांनाही थांबवून, कोविड तपासणीचे महत्व सांगत तपासणी करण्याचे आवाहन केले. मात्र नागरीक तिथून पळ काढण्यात धन्यता मानत होते. वास्तविक आता जनतेनेही प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारी झालेल्या तपासणीत ९ तर मंगळवारी पार पडलेल्या तपासणीत ८ लोकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना स्वॅब तपासणीसाठी मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दोन ते तीन दिवसांत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. अशी माहिती सहाय्य्क आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी दिली.