आठवडाभरात बलात्कार, विनयभंगाच्या दोन घटना
नवी मुंबई : एकटी महिला हेरून चोरी, विनयभंग व बलात्काराच्या घटना घडत असल्याने लोकलमधून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभरात वाशी ते मानखुर्ददरम्यान बलात्कार व विनयभंगाच्या दोन घटना आहेत.
सध्या लोकलमधून अत्यावश्य सेवतील कर्मचारी व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी लोकलला गर्दी असते. इतरवेळी लोकल रिकामी असते. याचा गैरफायदा गुन्हेगारांनी घेतला आहेत.
आठवडाभरापूर्वी वाशी रेल्वे खाडी पुलावर रेल्वेरुळालगत २५ वर्षीय महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या वैद्यकीय तपासणीत तिला मारहाण आणि बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. आठ दिवसांनंतर या महिलेने जबाब न दिल्याने हा प्रकार लोकलमध्ये घडला की कोणी बलात्कार करून तिला त्या ठिकाणी आणून टाकले हे समोर आले नाही. पोलिसांनीही अद्याप कोणास अटक केली नाही, मात्र बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न या कलमान्वये वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना ताजी असतानाच नाताळच्या दिवशी वाशी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान एका गरोदर महिला प्रवाशावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. पीडित महिला घणसोली येथून शिवडी या ठिकाणी जात होती. तिने वाशी रेल्वे स्थानकातून पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल पकडली. त्या दिवशी नातळनिमित्त सुट्टी असल्याने सकाळची वेळ असूनही ती रेल्वे डब्यात एकटीच चढली. गाडीतही दुसरी कोणी महिला नव्हती. गाडी सुरू होताच एक युवक गाडीत चढला. सुरुवातील त्याने त्या महिलेकडे पाहात अश्लील हावभाव करणे सुरू केले. नंतर त्याने थेट तिच्याशी शारीरिक लगट करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने त्याला प्रतिकार केल्यानंतर तिला जोरदार धक्का मारला. यात तिच्या डोक्याला मागील भागात मुका मारही लागला. तिने गयावायाही केली.
तोपर्यंत मानखुर्द रेल्वे स्थानक आल्याने तिची सुटका झाली. रेल्वे स्थानक येताच चालत्या गाडीतून उतरून तो पळून गेला. सीसीटीव्ही चित्रीकरणावरून पोलिसांनी या आरोपीला अटक केली
दुसऱ्या दिवशी गुन्हा
आरोपी मानखुर्द रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडित महिला गोवंडी रेल्वे स्थानकावर उतरली. तेथून ती परत वाशी रेल्वे स्थानकात आली. वाशी रेल्वे पोलिसांना तिने हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ती घाबलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पीडित महिलेने मात्र पोलिसांच्या अंतर्गत अडचणीमुळे दुसऱ्या दिवशीही संध्याकाळी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
वाशी ते मानुखर्दु रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपी अयान बेग याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता पोलीस ठाण्यात आल्यावर गुन्हा नोंद केला. मात्र आरोपी दाखवण्याची मागणी काही समाजसेविका आणि पीडितेच्या नातेवाईकांनी केली होती. कायद्यानुसार ते अयोग्य असून नियमानुसार ओळख परेड व अन्य बाबी करणे गरजेचे आहे.
–विष्णू केसरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक