नवी मुंबई : नवी मुंबईत जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ ११ महिन्यात १ अब्ज ३७ कोटी ८० लाख ६२ हजार ३१७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. तर ४० कोटी ४३ लाख ४४ हजार ४५६ एवढी रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले. ११ महिन्यात ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत अशा ६२ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. कमी गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवण्याचा मोह, आणि सायबर गुन्ह्याबाबत अज्ञान या मुख्य कारणांनी ही फसवणूक झाली असून तक्रार उशिरा देणे आणि तपास अत्यंत किचकट असल्याने गुन्हेगारांचे फावते आहे.
सट्टा बाजारात गुंतवणूक करा अल्पवधीत भरघोस परतावा मिळावा, आम्ही पाठवलेल्या यु ट्यूब लिंकला लाईक सबस्क्राईब करा घरबसल्या रिवॉर्ड मिळवा, केवळ पॉईंट द्या आणि लाखो रुपये कमवा अशा फसव्या जाहिरातींना बळी पडलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच केंद्रीय अन्वेषण किंवा सीआयडी मधून बोलत असल्याची थाप मारत डिजिटल अटक, तुमच्या खात्यातून अतिरेक्यांना पैसे गेले आहेत अशी धमकी देत पैसे घेतले जातात. तसेच ऑनलाइन कॅमेरा चॅटिंग मध्ये अश्लील बोलून बीभत्स चाळे करण्यास भाग पाडणे आणि त्याची रेकॉर्डिंग करून पैशांची मागणी करणे असेही प्रकार घडले आहेत. यावर्षीची आकडेवारी चक्रावणारी असून ऑनलाइन फ्रॉडचे ३५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ३७ गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ ११ महिन्यात १ अब्ज ३७ कोटी ८० लाख ६२ हजार ३१७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.
हेही वाचा…Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
गुन्हा नोंद होताच ज्या बँकेत तक्रारदाराने रक्कम वर्ग केली आहे. त्या बँकेशी संपर्क साधून तात्काळ संबंधित खाते गोठवण्यात आल्याने ४० लाख ४३ हजार ४४ हजार ४५६ रुपये वाचले आहेत. मात्र ही रक्कम मिळवणे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. समाज माध्यमातून बदनामी करणे, अश्लील फोटो टाकणे अशा ४२ तक्रारी आल्या असून त्यात २५ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
हेही वाचा…फेब्रुवारीपासून जेएनपीए ते गेट वे अवघ्या २५ मिनिटांत; उरणकरांसाठी जलद प्रवास सुविधा
बचावाचे पाच सोपे नियम सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की सायबर फसवणुकीपासून बचावाचे पाच अगदी सोपे नियम आहेत.
हे नियम असे –
कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चॅटींग करू नये.
अनोळखी व्यक्तीने सोशल मिडीयाद्वारे सांगितलेले, गुंतवणूक योजना, पैसे वाढविण्याच्या स्कीम्स, विविध रिवार्ड पॉईंट्स कूपन्स अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
व्हॉटसॲप किंवा ई- मेलद्वारे आलेले डॉट ए.पी.के फाईल किंवा लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू नये.
कोणतेही अनोळखी ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करून नये.
कोणाताही ओ.टी.पी, पासवर्ड कोणालाच शेअर करू नये.
नवी मुंबईत ११ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीचे ३५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ३७ गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.