उरण : प्रस्तावित शंभर खाटांचे रुग्णालय नव्या आराखड्यामुळे पुन्हा एकदा रखडले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांच्या मंजुरीनंतर पुन्हा उरणच्या नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्णालयासाठी सिडकोने दिलेला हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने या रुग्णालयाचा आराखडा बदलण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ सप्टेंबरला या रुग्णालयाचे भूमिपूजन विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही आज प्रयत्न प्रत्यक्षात रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. उरणमधील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिका तसेच पनवेल मधील उपजिल्हा व न परवडणाऱ्या खाजगी रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे.

रुग्णालयासाठी सिडकोने दिलेला हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने या रुग्णालयाचा आराखडा बदलण्यात आला आहे. अगोदरच्या आराखड्यात या भूखंडावर रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुले बांधण्यात येणार होती. यासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र हा भूखंड सीआरझेडच्या कचाट्यात अडकल्यामुळे येथे फक्त रुग्णालयासाठीच जागा उरत होती. त्यामुळे हा आराखडा बदलण्यात आला आणि नवीन आराखडा बनविण्यात येत आहे. या आराखड्यानुसार मंजूर भूखंडावर फक्त रुग्णालय उभारले जाणार आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुले बांधण्यासाठी उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या जवळचा भूखंड निश्चित करण्यात आला आहे.

या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाच्या नवीन आराखड्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. भूमिपूजन केल्यानंतर निवडणुका आल्याने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा भूमिपूजन सोहळा केवळ दिखाऊपणा होता का, असा सवाल आता उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे. २०१० मध्ये उरण मधील अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांनी येथील अपघात आणि रुग्णसमस्यांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आंदोलनानंतर शासनाने २०१० मध्ये उरण मध्ये १०० खाटाचे रुग्णालय उभरण्याला प्रशासकीय मंजुरी दिली. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षांपासून हे रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेले आहे.

सीआरझेडचा पेच

२०१० मध्ये महायुती सरकारच्या काळात उरण तालुक्यात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. दीपक सावंत आरोग्य मंत्री असताना सिडकोने १० कोटी रुपये निधी मंजूर केला होता.

रुग्णालयासाठी सिडकोच्या माध्यमातून उरण-पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहती शेजारी भूखंड दिला. रुग्णालयासाठी ५८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र सीआरझेड आणि निधीच्या कमतरतेमुळे हे रुग्णालय रखडले होते.

नवीन आराखड्यानुसार बोकडवीरा येथील भूखंडावर तळमजल्यासह चार मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये १०० खाटांचे रुग्णालय असणार आहे, तर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरणच्याबाजूला असलेल्या भूखंडावर कर्मचाऱ्यांसाठी तीन इमारती बांधण्यात येणार आहेत.

टी-१ मध्ये १० निवासी खोल्या, टी-२ मध्ये २८ निवासी खोल्या आणि टी-३ मध्ये ९ निवासी खोल्या आणि अधिकाऱ्यासाठी १ निवास असणार आहे. यासाठी ८४.५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या आराखड्याला लवकरच मान्यता मिळाल्या नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यासाठी निधीची अडचण नाही. नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण