पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेश भाविकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली. डोक्यावर पाऊस पडत असताना लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही घटना घडली.
जखमींना पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तर शहरातील लाईफलाईन पटवर्धन व पटेल अशा विविध रुग्णालयात स्वयंसेवक घेऊन गेले. यावेळी पालिकेचे कर्मचारी असल्याने पालिका प्रशासनाने धावाधाव करुन भावीकांना वेळीच उपचार दिले. विजेच्या झटक्याचे नेमके कारण शोधण्यासाठी अग्निशमन दल व पोलीसांचे पथक काम करत होते. उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी दाखल सात रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. पालिकेने विसर्जनघाटावर जनरेटरची सोय केली होती. याच जनरेटरची वीजवाहिनी तुटून भाविकांच्या अंगावर पडल्याने हा अनर्थ घडल्याचा प्राथमिक अंदाज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : शहरात मुसळधारा मोरबे क्षेत्रात मात्र रिमझिम; मोरबे धरणात ८५% पाणीसाठा
गणेश विसर्जन शांततेत व सूरक्षेत पार पडावे यासाठी विसर्जन घाटांवर पालिका आयुक्त गणेश देशमुख व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील हे गस्त घालत असताना त्यांना ही घटना कळविण्यात आली. तातडीने हे दोनही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यावेळी आयुक्त देशमुख यांच्यासह पथकाने कुंभारवाड्यातील राहणा-या ३२ वर्षीय हर्षद पनवेलकर व उलवे येथे राहणारा १७ वर्षीय मानस कुंभार याला लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले. मानस यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सूरु आहेत. तर उपजिल्हा रुग्णालयात पाच वर्षीय निहाल चोनकर, १५ वर्षीय सर्वेश पनवेलकर, ६५ वर्षीय दिलीप पनवेलकर, २४ वर्षीय दिपाली पनवेलकर, १८ वर्षीय वेदांत कुंभार, ३६ वर्षीय दर्शना शिवशिवकर तर जखमींमध्ये ९ महिन्याचे तनिष्का पनवेलकर या बाळाला स्वता पोलीस उपायुक्त पाटील व विजय कादबाने यांचे पथकाने दाखल केले. इतर जखमींपैकी ३५ वर्षीय रुपाली पनवेलकर आणि ३८ वर्षीय रितेश पनवेलकर यांना पटवर्धन रुग्णालयात पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके व गणेश शेटे यांच्यासह पालिकेच्या कर्मचा-यांनी दाखल केले. विशेष म्हणजे पनवेलमधील कोळीबांधव हे गणेशविसर्जनावेळी पालिकेच्या अग्निशमन दलाला सहकार्य करण्यासाठी स्वता विसर्जन घाटावर तैनात राहतात. जखमींपैकी अनेकजण हे पाण्यात गणेशमुर्ती विसर्जन करताना जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.