अडीच वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा, भविष्यात ‘रो-रो’

मुंबईमधील वाहतूक कोंडीवर जलवाहतूक हा एक पर्याय मानला जात असल्याने राज्य शासनाने मुंंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि सिडको यांना जलवाहतुकीसाठी जेटी उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर सिडकोने नेरुळ येथील अद्ययावत व आधुनिक अशा १११ कोटी रुपये खर्चाच्या जेटीचे काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट व मेरीटाईम बोर्डाच्या अगोदर नवी मुंबईतील जलवाहतूक टर्मिनल उभे राहणार आहे. यासाठी ३० महिन्याची मुदत देण्यात आली असून पहिल्या सहा महिन्यात पर्यावरणविषयक लागणाऱ्या परवानग्या घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबईत कामानिमित्ताने जाणाऱ्या नवी मुंबईकरांची संख्या जास्त असल्याने या प्रवासी वाहतुकीची वाट पाहिली जात आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात वाहतुकींची मोठी समस्या उभी राहिली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक कोडींची सोडवणूक सर्व प्राधिकरणांनी संयुक्तरीत्या सोडवावी असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला लाभलेल्या विस्तीर्ण अशा खाडीकिनाऱ्याचा वापर करण्यात यावा, असा एक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी देशातील जलवाहतुकीसाठी आग्रही आहेत. मुंबई नवी मुंबईला जोडणारी जलवाहतूक म्हणून खासगी हॉवरक्रॉप्ट सेवा काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती, मात्र कामगारांच्या प्रश्नावरून ती नंतर बंद करण्यात पडली. त्यानंतर आता राज्य शासनाने भाऊचा धक्का ते नेरुळ आणि रेवस मांडवा अशी प्रवासी जलवाहतूक व रो-रो सेवा सुरू करण्याचे आदेश मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको आणि मेरीटाईम बोर्डाला दिले आहेत. त्यातील नेरुळ येथील वॉटर टर्मिनल सिडको उभारणार असून रेवस मांडवा येथील जेट्टी मेरीटाईम बोर्ड बांधणार आहे. भाऊच्या धक्यावर जलवाहतूक टर्मिनल उभारण्याचे काम बीपीटी करणार आहे. सिडकोने नेरुळ येथे अनिवासी भारतीय संकुलाच्या मागे (एनआरआय) जलवाहतूक टर्मिनलसाठी जागा निश्चित केली असून त्यासाठी १११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जेट्टीवर जाण्यासाठी पामबीच संलग्न ३० मीटर रुंद व ६५५ मीटर लांबीचा एक रस्ता तयार केला जाणार असून ७६१ चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत उभारली जाणार आहे. इमारतीत प्रतीक्षालयापासून ते फूड कॉर्नपर्यंतच्या सर्व सुविधा राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता आर. बी. दायटकर यांनी सांगितले.

जेट्टीवर वाहन लावून मुंबईत येजा करणाऱ्यासाठी ३१ कार आणि ११ बसेससाठी वाहनतळ राहणार आहे. त्याचप्रमाणे बोटीसाठी अँकर सुविधा राहणार आहे. जलवाहतूक टर्मिनल उभारण्याचा अनुभव असणाऱ्या कारज्युअल कंपनीच्या साहाय्याने अजवानी इन्फ्रा यांना हे काम मिळाले असून त्यांना तीस महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यातील पहिले सहा महिने हे वन तसेच पर्यावरणविषयक काही परवानग्या घेतल्या जाणार असून प्रत्यक्षात काम २४ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. या सर्व टर्मिनलचा आराखडा कॅशेक इंजिनीअरिंग यांनी तयार केला आहे.

राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने जेट्टी उभारण्याच्या या कामाला प्राधान्य दिले आहे. कंत्राटदाराला काम करण्याचे कार्यादेश देण्यात आले असून ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यातील सहा महिने पर्यावरणविषयक परवानगी घेण्यासाठी आहेत.

के. के. वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको

Story img Loader