नवी मुबई महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीची बैठक चारच मिनिटांत आटोपली. शहरातील विविध प्रकारच्या तब्बल १२ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
यामध्ये ऐरोली नाका येथील समतानगर भाागतील उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्याखालील भूखंड विकसित करणे, सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी संकुलातील विविध कामे करणे, कोपरखरणे येथील एमआयडीसी भागातील पावणेश्वर मंदिर ते नोसिल कंपनीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व गटार बॉक्स बसवण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या वेळी विरोधी पक्षांचे नगरसेवक जगदीश गवते वगळता बाकी सदस्य अनुपस्थित होते, तर स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के गैरहजर असल्याने पीठासन आधिकारी म्हणून सभागृह नेते जयंवत सुतार यांनी सभा हाताळली. या वेळी १२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली, तर नगरसेवक जगदीश गवते यांनी स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिका वेळेत मिळत नसल्याचा आरोप केला. तर पीठासन अधिकारी जयंवत सुतार यांनी प्रशासनाला येथून पुढे वेळेत सर्वाना कार्यक्रमपत्रिका देण्याचे निर्देश दिले.