२०११ साली झालेल्या जनगणनेत तांत्रिक अडचणीमुळे पनवेल तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती होता; मात्र याची स्पष्टता झाल्याने निवडणूक विभागाने तातडीच्या सूचना देऊन ५ मे रोजी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हरकतींवर सुनावणी घेऊन मतदार यादींचा कार्यक्रम हाती घेण्याच्या महसूल विभाग मार्गावर आहे.

महसूल विभागाच्या या लगबगीमुळे १२ ग्रामपंचायतींमध्ये मेअखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुका होण्याची दाट शक्यता प्रशासनातील बडय़ा अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. आसूडगाव, कळंबोली आणि रोडपाली येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये शहरी मतदार नको, अशी भूमिका घेतल्याने येथे निवडणुका होणार नसल्याची चर्चा होती. मात्र पनवेलचे महसूल विभाग १२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बनवत असल्याचे सूत्रांकडून समजते.

लवकरच सरकार पनवेलमध्ये महानगरपालिका जाहीर होईल, त्यामुळे राजकीय पक्षांना दोनदा निवडणुकांना सामोरे जायला नको म्हणून अनेकांनी ग्रामपंचायत निवडणुका टाळून थेट महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करावी, असे मत व्यक्त केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे नव्याने ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये प्रभाग रचना, आरक्षणाचा विशेष कार्यक्रम महसूल विभागाने लगबगीने हाती घेऊन लवकरच या नवीन प्रभाग रचनेनुसार अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून वंचित असलेल्या मतदारांना संधी देण्याचे ठरवले आहे.

जे मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मतदान करतात त्यांना तेथील ग्रामपंचायतींमध्ये मतदान करण्याची संधी मिळावी अशा समान कायदेशीर हेतूने महसूल विभागाने निवडणूक कार्यक्रम हाती घेतला आहे.

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे कळंबोली, रोडपाली, टेंभोडे, नावडे, पेणधर, पालेखुर्द (देवीचा पाडा), पडघे, घोट (चाळ), तोंडरे (नागझरी), वळवली, आसूडगाव, खिडुकपाडा या ग्रामपंचायतींमध्ये नवीन प्रभाग पडून निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच कळंबोली, रोडपाली, नावडे व आसूडगाव या गावांलगतच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना संधी मिळणार आहे. ५ मेला मतदारांच्या हरकतींवर प्राधिकृत अधिकारी आपला अंतिम निर्णय जाहीर करतील. त्यानंतर १० मे रोजी अंतिम सुधारित प्रभाग रचना व आरक्षण या १२ ग्रामपंचायतींमध्ये जाहीर होईल.

Story img Loader