नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात जलप्रदूषण टाळण्यासाठी १३६ कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत.महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले आहे. पालिकेने गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी मंडळांना अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळावी याची खबरदारी घेतली आहे.
तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या १४ मुख्य तलावांतील जलाशयांच्या साधारणत: ३० टक्के भागात पालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि जलप्रदूषण रोखावे असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जन स्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेण्यात येत आहे.
हेही वाचा >>> पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी
कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम करण्यात येणार आहे. पालिकेच्या ८ विभाग कार्यालय क्षेत्रात एकूण १३६ कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जाणार आहेत. पारंपरिक २२ व कृत्रिम १३६ अशा १५८ विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या तयारीला पालिका प्रशासन लागले आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
पालिका क्षेत्रात २२ पारंपरिक विर्सजन स्थळे असून त्या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी व एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता मागील ५ वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. या कृत्रिम तलावांना नागरिकांचा दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मागील वर्षी कृत्रिम तलावामध्ये मूर्ती विसर्जनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गतवर्षी कृत्रिम तलावात १४ हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करून नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या पर्यावरणविषयक जागरूकतेचा प्रत्यय दिला होता.
पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी गणेशमूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करावा. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका