पनवेल: पनवेल पालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे १२६ तसेच मलेरियाचे ४२ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात १८ दिवसात २२ रुग्ण डेंग्यूचे तसेच ३७ रुग्ण मलेरियाचे आढळले. मागील नऊ महिन्यात पालिकेच्या आरोग्य विभागात ६ रुग्ण खारघर व रोंहिजन परिसरात स्वाईन फ्लूचे आढळल्याची नोंद आहे. मात्र साथरोगांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण सरकारी प्रयोगशाळेपेक्षा खासगी प्रयोगशाळेत अधिक असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागावर संशयीत रुग्णांच्या चाचण्यांसाठी रुग्णशोध मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे.
पनवेलमध्ये साथरोगामुळे एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. पनवेल पालिका क्षेत्रातील अनेक बालकांमध्ये ताप, डोकेदुखी व पोटदुखी या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेने सूरु केलेल्या प्रत्येक वसाहतीमधील आरोग्य वर्धिनीमध्ये साथरोगाची चाचणी करण्याचे प्रमाण अधिक होणे गरजेचे आहे. मात्र चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यासाठी लागणारा विलंब अधिक असल्याने पालिकेने स्वताची प्रयोगशाळा तातडीने सूरु करण्याची गरज आहे.
हेही वाचा… कोपरखैरणेत विसर्जनानिमित्त अनेक रस्त्यावर नो पार्किंग…
पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी मागील आठवड्यात प्रयोगशाळा सूरु करण्यासाठी पाठपुरावा सूरु असल्याची माहिती दिली. परंतू या दरम्यान साथरोगांचे पनवेलमधील रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. बालकांमध्ये संशयीत स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे दिसत असली तरी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मात्र सप्टेंबर महिन्यात एकही रुग्ण स्वाईन फ्लू आजाराने उपचार घेत असल्याची नोंद नाही. तसेच संशयीत स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या तोंडातील लाव्हा चाचणींसाठी नमुणे घेण्याची सोय शहरातील स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात केली आहे. या रुग्णालयात आतापर्यंत एकही रुग्ण स्वाईन फ्लू आजाराच्या संशयासाठी चाचणीसाठी आले नसल्याची माहिती या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधूकर पांचाळ यांनी दिली.
हेही वाचा… नवी मुंबई: माजी नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल
पालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची सरकारी प्रयोगशाळेतील कार्यवाहीवर विश्वास ठेऊन संशयीत रुग्णांनी चाचणी करण्यासंबंधी जनजागृतीची मोहीम पनवेलमध्ये तोकडी पडली आहे. खासगी प्रयोगशाळेत दूस-याच दिवशी संशयीत रुग्णांचा स्वाईन फ्लूचा अहवाल मिळतो. यासाठी खासगी प्रयोगशाळा चालक रुग्णांकडून सात हजार रुपये आकारतात. स्वाईन फ्लू चाचणीचा अहवाल देणारी सरकारी प्रयोगशाळा पुणे येथे असल्याने येथून अहवाल येण्यासाठी लागणा-या विलंबामुळे रुग्ण सरकारी प्रयोगशाळेकडे पाठ दाखवितात असे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगीतले.
नागरिकांनी साथरोगामध्ये भितीच्या सावटाखाली राहण्याऐवजी पनवेल पालिकेने तसेच सरकारी आरोग्य विभागाने दिलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेऊन त्याबद्दलची अंमलबजावणी केल्यास साथरोग टाळणे शक्य होईल. गुरुवारी यासाठीच संयुक्त लोकसभा बैठक आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात बोलावली आहे. स्वाईन फ्लू आजाराचे जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यात ६ रुग्ण आढळल्याची नोंद पालिकेकडे आहे. हे सर्व रुग्ण आता बरे आहेत.
स्वाईन फ्लूच्यावेळेस ताप १०२-१०३ डिग्री सेल्सीअसपर्यंत येतो. तसेच थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, खूप जास्त थकवा येणं, डायरिया, उलट्या होणे अशी लक्षणे असतात. मलेरिया या साथरोगावेळी थंडी ताप, स्नायू आणि अंगदुखी, उलट्या, जुलाब ही लक्षणे संशयीतांमध्ये दिसतात. थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डेंग्यू आजारावेळी डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं. शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा असणे ही लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे असल्यास नागरिकांनी खबरदारीसाठी नजीकच्या पालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. – डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका