पनवेल: कासाडी नदीचे प्रदूषीत पाणी प्याल्याने १२ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नावडे गावातील ग्रामस्थाने केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कासाडी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पशू वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी संबंधित बकऱ्यांपैकी एका मृत बक-याचे नमुणे तपासणीसाठी घेतले असून अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित बक-यांचा मृत्यू कशामुळे झाला त्यावर माहिती देता येईल असे स्पष्टीकरण पशू वैद्यकीय विभागाने दिले आहे.

नावडे गावात राहणारे बुधा म्हात्रे यांच्या २४ बकऱ्या आहेत. त्यापैकी १२ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बुधा म्हात्रे यांनी पंचायत समिती आणि पनवेल पालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. मागील पाच दिवसांपासून रविवारपर्यंत या बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे बुधा म्हात्रे यांनी सांगीतले. कासाडी नदीच्या शेजारी या बकऱ्या चरण्यासाठी गेल्यावर ही घटना घडल्याचे म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत म्हात्रे यांनी पनवेलचे तहसिलदार, महाराष्ट्र प्रद्रुषण नियंत्रण मंडळ तसेच पनवेल पालिका आणि पनवेल पंचायत समितीचे पशू वैद्यकीय विभागांना कळविले. म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल घेऊन सोमवारी कासाडी नदीत ज्याठिकाणी चार बकऱ्या मृत्यूमुखी पडलेल्या त्याठिकाणचा पंचनामा करुन मृत बकऱ्यांची पाहणी सरकारी अधिका-यांनी केली. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मारकरवार यांच्यासह इतर डॉक्टरांनी मृत बकऱ्यांपैकी एकाचे नमुणे घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील निदान संशोधन केंद्रात पाठविले. पुढील पंधरा दिवसात त्याचा अहवाल आल्यावर पशू वैद्यकीय अधिकारी नेमका बकऱ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दल खात्रीशीर सांगू शकतील. कासाडी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादासमोर शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी मांडला होता. याबाबत रितसर सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका म्हात्रे यांनी दाखल केली होती. याचिकेच्या सूनावणी दरम्यान लवदाने प्रदूषणाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आणि तळोजातील प्रदूषित कारखानदारांविरोधात ताशेरे ओढले होते. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना याच प्रदूषणामुळे १५ कोटी रुपयांपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाने दंड जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही कासाडी नदीतील प्रदूषण कमी झाले नाही. यामुळे माजी नगरसेवक म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या बुधा म्हात्रे यांच्या इतर बकऱ्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने पशू वैद्यकीय अधिकारी इतर बकऱ्यांची तपासणी व त्यावरील औषधोपचार करीत असल्याची माहिती डॉ. मारकवार यांनी दिली.

हेही वाचा >>>नवी मुंबई: कांदा आणखीन वधारणार? एपीएमसीत कांद्याच्या दरात वाढ

रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या कोषागारात उद्योजकांकडून दंड वसूलीचे १५ कोटी रुपये कासाडी नदी संवर्धनासाठी जमा आहेत. मुंबई येथील आय.आय.टी. संस्थेने ९ महिने कासाडी नदीचा अभ्यास करुन कासाडी नदीच्या कोणत्या नदीपात्रात कोणते रसायने साचले आहेत याचे नमुने घेऊन त्याचा अभ्यास करुन तेथे कोणकोणते उपाययोजना करता येतील याचा सविस्तर अहवाल दिला आहे. हा अहवाल बनविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आय.आय.टी. संस्थेला ३७ लाख ७६ हजार देण्यात आले. हा अहवाल देऊन दोन महिने उलटले तरी कोणतेही कारवाई झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे काम पनवेल पालिका करणार की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार हे अद्याप ठरले नाही. त्याची निविदा प्रक्रीया पार पडली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने १७ ऑगस्टला यावर बैठक बोलावली आहे.

जलदगतीने कासाडी नदीचे संवर्धन होत नसल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी पर्यावरणासारख्या जनहिताच्या कामासाठी तरी गती दाखविणे गरजेचे आहे.- अरविंद म्हात्रे, याचिकाकर्ते