पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरून वाहन चालविताना पोटातील पाणी गदागदा हलेल आणि संबंधित वाहनातील व्यक्तींच्या कमरेची हाडे सैल होतील, अशी सोय पनवेल नगरपरिषदेने केली आहे. या मार्गावर एक किलोमीटर अंतरात प्रशासनाने तब्बल १५ गतिरोधक बसवले आहेत. एका अपघातामुळे हे शहाणपण नगरपरिषदेला सुचले असले तरीही या मार्गावरून रोज ये-जा करताना वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
जानेवारीमध्ये एका अपघातात बालकाचा बळी गेल्यानंतर नगरपरिषद आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी या मार्गावर गतिरोधक बसवून घेतला. उच्च न्यायालयाने गतिरोधकाबद्दल दिलेल्या निर्देशाला फाटा देत सामान्यांना ही शिक्षा दिल्याचे बोलले जात आहे.
पनवेल शहरात नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे अनेक समस्यांना सामान्य पनवेलकर तोंड देत आहेत. शहरातील अनियंत्रित फेरीवाले, अरुंद रस्ते या त्यापैकी दोन समस्या आहेत. मागील अनेक वर्षांमध्ये पनवेल फेरीवाला मुक्त आणि रस्ते रुंदीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने कोणतेही ठोस पाऊल अद्याप उचलले नाही. मागील महिन्यात नित्यानंद मार्गावर लहान मुलाला एनएमएमटी बसने दिलेल्या धडकेत बालकाचा मृत्यू झाला. संतप्त रहिवाशांची मागणी पूर्ण करताना परिषदेने तब्बल १५ गतिरोधक बसवले.
नित्यानंद मार्ग हा गार्डन हॉटेल येथून सुरू होतो. या मार्गावर सहस्रबुद्धे रुग्णालय, नवीन पनवेल पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्तांचे आणि साहाय्यक आयुक्तांचे कार्यालय आहे. हा मार्ग पुढे नगरपरिषद इमारतीला जोडला जातो. एखाद्या मार्गावरील किती अंतरावर किती उंचीचे आणि किती गतिरोधक असावेत यासाठीची नियमावली उच्च न्यायालयाने ठरवून दिली आहे. परंतु याला नगरपरिषदेने फाटा दिला आहे.
नागरिकांना गतिरोधकांचा त्रास होत असल्यास लवकरच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बैठक घेऊ. वाहतूक विभागाच्या सूचनेनंतर गतिरोधक काढून टाकण्यात येतील.
मंगशे चितळे – मुख्याधिकारी, पनवेल नगरपरिषद
गतिरोधकांबाबत उच्च न्यायालयाचे थेट निर्देश आहेत. तसेच इंडियन रोड कँाग्रेसने प्रमाणित केलेल्या निकषाचे उल्लंघन पनवेल शहरामधील गतिरोधक बांधकामांमध्ये झालेले आहे. तसे लेखी पत्र पनवेल शहर वाहतूक विभागाने पनवेल नगरपरिषदेला देऊन त्याबद्दल कळवले आहे.
बाळासाहेब गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक