नवी मुंबई : पोलिसांनी मनावर घेतले तर कितीही अवघड क्लिस्ट गुन्ह्यांची उकल होऊ शकते. याची प्रचिती नेरुळ येथे एका अपहरणाच्या गुन्ह्यात आली. स्टेशनच्या पदपथावर राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण केले गेले. याबाबत गुन्हा नोंद झाला. मात्र पदपथावर राहणारी मुलगी असल्याने कुठलेच धागेदोरे सापडत नव्हते. शेवटी सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली.
मनी थॉमस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ७४ वर्षाचा आहे. नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथवर राहणाऱ्या ४ वर्षीय मुलीला खाऊचे अमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले होते.गुन्हा नोंद झाल्यावर नेरुळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा माग काढत त्याला करावे गावातून जेरबंद केले आहे.
आणखी वाचा-हवा प्रदूषणात उरणचा देशात पहिला नंबर
यासाठी पोलिसांनी तब्बल विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केले. नेरुळ स्टेशन ते आरोपीचे राहते घर असा माग काढत पोलीस करावे गावात पोहचले व आरोपीस जेरबंद केले. त्या ठिकाणी आढळून आलेल्या मुलीस पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पालकांच्या स्वाधीन केले. आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीला परराज्यात नेऊन विकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.