नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या व नवी मुंबई शहरावर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. या कामासाठी देण्यात आलेली २१ नोव्हेंबर या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने शहरातील लिडारनंतर या कामालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता नवी मुंबई शहरावर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार असून त्यासाठी नवी मुंबईकरांना २४ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
हेही वाचा- ट्रान्स हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा
तत्कालीन आयुक्त अभिजीत बाांगर यांच्या काळात सुरु झालेल्या अनेक कामापैकी लिडार सर्वेक्षण व शहरावर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या दोन्ही कामांना पालिकेने मुदतवाढ दिलेली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. मेसर्स टाटा अँडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांच्याकडून शहरात प्रत्यक्ष काम करण्यात येत असून पुढील काही महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील २८२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतू शहरातील सर्वच विभागात१५०० महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महापालिका जवळजवळ १५० कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पध्दतीने शहर तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत आणणार असून त्यासाठीची सुरवात झाली आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व्याप्त हद्दीतील महत्वाची निवडक ठिकाणे,नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे,मुख्य चौक, मार्केट, बस डेपो,रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी पालिकेने २०१२ रोजी २८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतू आयटी उपकरणे यांचे आयुर्मान ५ वर्ष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात १५०० अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक वर्षापासून लालाफितीत व दरांवरुन अडखळत पडला होता.
नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली मुलुंड उड्डाणपुल,ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका,बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारावर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहे. शहरासाठी महत्वाच्या असलेल्या कामात शहराच्या प्रत्येक प्रवेश निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येत आहेत. तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने नंबर प्लेट् वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व बसडेपो ,मार्केट, उद्याने, मैदाने, पालिका कार्यालये,वर्दळीची ठिकाणे, चौक ,नाके, मर्मस्थळे ही सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार आहेत.तसेच शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पिड कॅमेरे लावण्यात येत आहेत.त्याचप्रमाणे शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे.
हेही वाचा- केडीएमटी बसला बेलापूर इथे लागली आग
तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ८ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रिय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. या कामाचा डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असेल तसेच ते पालिकेकडेही स्थापित करण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालय किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये विभागीय चित्रीकरण असणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात घटना घडली तर ती नजीकच्या पोलीस स्थानकातही पाहता येणार आहे.
रेड लाईट व्हायलेन्सन म्हणजेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांच्यावर नजर ठेवण्यासाठी देखरेखीसाठी ९६ कॅमेरे असणार आहेत.त्यामुळे नागरीकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत. सीसीटीव्हीच्या १५४ कोटीच्या कामासाठी २७४ कोटीची निविदा आधी आली होती.त्यामुळे तत्कालिन पालिका आयुक्त बांगर यांनी ती निविदा प्रक्रियाच रद्द करुन नव्याने या कामासाठी निविदा मागवली त्यामध्ये वजा ७.०४ कमी दराने निविदा स्विकृती केल्यामुळे पालिकेचा अंदाजे २० कोटीचा फायदा होणार आहे.संबंधित ठेकेदाराला ९ महिन्याची कामाची मुदत देण्यात आली होती.२१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती.आता पुढील काही महिन्यात शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.
हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेचा कचरा वाहतूक व संकलनासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात
कोणते व किती कॅमेरे..
हाय डेफिनेशन कॅमेरे-९५४
पीटीझेड कॅमेरे-१६५
वाहनांची गती देखरेख कॅमेरे-९६
पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा-४३ ठिकाणे
खाडी व समुद्र किनारे देखरेख थर्मल कॅमेरे-९
सार्वजनिक घोषणा ठिकाणे-१२६
नवी मुंबई शहरात जवळजवळ १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार असून सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण काम होत आहे. सुरवातीला तसेच १५४ कोटीच्या कामासाठी २७४ कोटीपर्यंत निविदा आल्याने ती निविदा प्रक्रियाच रद्द केली.नव्याने दिलेल्या कामात १२७ कोटीत काम होणार असून पालिकेचे कित्येक कोटीची बचत होणार आहे.शहरावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.
हेही वाचा- बुधवारी एपीएमसी संचालक मंडळाचा निकाल लागणार?
नवी मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणारे हे काम योग्य पध्दतीने होण्यासाठी पालिका कटाक्ष ठेऊन आहे.दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यात आले नाही.सगळीकडे असलेला करोनाचा प्रादुर्भाव तसेच अत्याधुनिक पध्दतीचे कॅमेरे उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत होत्या. परदेशातून याबाबतचे सर्व साहित्य मिळवताना युदधजन्य स्थिती व इतर कारणामुळे या कामाला थोडा विलंब लागला.परंतू फेब्रुवारी अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.