संतोष जाधव
लोकप्रतिनिधींच्या टीकेला प्रशासनाचे आकडेवारीतून उत्तर
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे नागरी कामांना मंजुरी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना प्रशासनाने गत आर्थिक वर्षांतील कामांच्या खर्चाच्या आकडेवारीद्वारे उत्तर दिले. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत पालिकेने नागरी विकासकामांसाठी १७६२ कोटी २८ लाखांचा निधी खर्च केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षांच्या (२०१७-१८) तुलनेत या खर्चात सुमारे २३८ कोटींची वाढ झाली आहे. दुसरीकडे, गत आर्थिक वर्षांत पालिकेने तब्बल २०६४ कोटींचा महसूल जमा करत तिजोरीतही भर टाकली आहे.
गेल्या वर्षी मार्चअखेर पालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच १०० कोटींच्या वर करवसुली करण्यात आली होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत पालिकेने ५५० कोटी वसुलीचे लक्ष ठेवले होते. परंतु या वर्षी ४९२ कोटी जमा झाल्याची माहिती मालमत्ता कर विभागाने दिली. त्यामुळे महापालिकेत ‘अम्नेस्टी’ (थकबकीदारांना व्याज व दंड माफ) योजना येणार असल्यानेच मार्च महिन्यातील या वर्षीची वसुली कमी झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष वसुली यंदाही अधिकच असल्याचा दावा पालिकेनेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सन २०१८-१९ मध्ये अपेक्षित धरलेल्या एकूण उत्पन्नाचे लक्ष्य साध्य करीत त्यामधून गुणात्मक नागरी सेवा-सुविधा परिपूर्ती करण्यात आली आहे. करवसुलीच्या माध्यमातून महसूल विषयक बाबींकडे विशेष लक्ष देतानाच नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडेही लक्ष देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
लोकप्रतिनिधींकडून ‘विकास कामे होत नाहीत’ हा सूर ठेवत कायमच कोंडीत पकडण्याच प्रयत्न झाला. त्यामुळे वार्षिक आर्थिक आकडेवारीत प्रशासनाने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कोटींची कामे केल्याचे सांगितले.
पालिकेकडे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांत विविध माध्यमांतून २०६४ कोटी इतकी रक्कम जमा केली असून त्यात ११८३ कोटी जीएसटी सापेक्ष अनुदातून प्राप्त झाले आहेत. या आर्थिक वर्षांत १७६२ कोटी २८ लाख रुपये खर्चाची नागरी विकासकामे केली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
झालेली कामे
मागील आर्थिक वर्षांत शहरात चार ठिकाणी मंगल कार्यालये व बहुउद्देशीय इमारती, वाशी, कोपरखैरणे अग्निशमन केंद्र, तुर्भे माता बाल रुग्णालय नूतनीकरण, ऐरोली, कुकशेत, करावे येथे नागरी आरोग्य केंद्र ऐरोली, दिवा येथे आगरी कोळी शिल्प, चार विरंगुळा केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र,पामबीच मार्गावरील भुयारी मार्ग, करावे गॅसवाहिनी, सानपाडा सेन्सरी गार्डन, आयकर कॉलनी रेल्वे क्रॉसिंग पूल, घणसोली सेन्ट्रल पार्क, अमृत योजनेअंतर्गत हरित पट्टे, डिजिटल स्कूल, पामबीच मार्गावरील एलईडी फिटिंग अशी विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
मंजुरी मिळालेली कामे
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मागील तीन-चार महिन्यांत सायन्स पार्क, वाशी डेपो, जलतरण तलाव, बेलापूर येथे बहुमजली पार्किंग व्यवस्था, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, रस्ते फुटपाथसाठी वार्षिक देखभाल दुरुस्ती, विष्णुदास भावे नाटय़गृह दुरुस्ती, टीसीसी क्षेत्रात रस्ते काँक्रिटीकरण पदपथ, जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल, घणसोली येथे औषध भांडारगृह, नवीन शाळा बांधणे यासंह कोटय़वधीची कामे मंजूर केली असून कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाने शेवटच्या टप्प्यात कामांना मंजुरी दिली. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आधीच कामे मंजूर केली असती तर प्रत्यक्षात कामे मंजूर झाली असती. प्रशासनाने मालमत्ता कर वाढीसाठी लिडारबाबत आग्रह धरला असताना दुसरीकडे शहरातील आयटीक्षेत्रात असलेल्या चुकीच्या वापराबाबत जरी जास्त लक्ष दिले तर तेथूनही पालिकेला अधिक कर प्राप्त होईल.
– जयवंत सुतार,महापौर
पालिकेची आर्थिक वर्षांतील वसुली चांगली असून महसुलात वाढ झाली आहे. नागरी विकासकामांवरील खर्चही वाढला आहे. ‘अम्नेस्टी’ योजना लागू होणार म्हणून मार्च महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी कर वसूल झाला आहे. त्याचा परिणाम नक्की झाला आहे. परंतु पालिकेने नागरी कामासांठी मोठा महसूल खर्च केला आहे.
– धनराज गरड, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त विभाग