नवी मुंबई परिवहन उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होत असल्याने परिवहन वर्षानुवर्षे तोट्यामध्ये चालले आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहनाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपाय योजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवार ‘ शून्य इंधन दिवस’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंधनावरील बस पूर्णतः बंद ठेवून केवळ विद्युत बस रस्त्यावर चालविल्या जात आहेत. या योजनेमुळे गेल्या वर्षभरात एनएमएमटीला तब्बल अडीच कोटींचा फायदा झाला असून यादरम्यान २ लाख ४५ हजार ९५६लिटर डिझेलची बचत झाली आहे.
हेही वाचा- यंदा ड्रंक अॅण्ड ड्राईव्हमध्ये अडकले १६० वाहनचालक; गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढ
नवी मुंबई परिवहन उपक्रमाने १५ जानेवारी २०२२ पासून या शून्य इंधन दिवस योजनेला सुरुवात केली आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात विद्युत बसेसचा वापर वाढवून इंधनावरील खर्च कमी करून तोटा भरून काढण्यासाठी हे नियोजन आखण्यात आले आहे. आठवड्यात शनिवारी आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टी दिवशी विद्युत बस वापरात आणून इंधनावरील खर्च कमी करण्यात येत आहे. त्यामुळे महिन्याला परिवाहनाचा २३ लाखांची बचत होत असून वर्षभरात इंधनावरील खर्च कमी झाला असून अडीच कोटींचा फायदा झाला आहे. आठवड्याअखेरीस शनिवारी आणि रविवारी , या दोन दिवसात केवळ विद्युत बस सेवेत ठेवून, इंधन वरील खर्च कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक शहर ठेवण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी ते शुक्रवारीच्या तुलनेत ३०% ते ४०% बस शनिवारी , रविवारी उभ्या असतात. त्याऐवजी विद्युत बस रस्त्यावर धावत आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रम गेल्या वर्षभरापासून होणारा तोटा भरून काढण्यासाठी बस आगारांत वाणिज्य संकुल उभारून आर्थिक सक्षमिक करण्यात येत आहे.
त्याचबरोबर केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या पर्यावरण पूरक योजनेअंतर्गत बहुतांश विद्युत बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात असून रस्त्यावर देखील धावत आहेत . त्यातही परीवहनाला आणखीन नफा कसा मिळवून देता येईल याकरिता हा शून्य इंधन दिवस उपक्रम राबविण्यात येत आहे . या पर्यावरण उपक्रमांतर्गत एनएमटीचे आर्थिक बचत होत असून त्याचबरोबर इंधन बचतही होत आहे.