पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मागील वर्षी वडघर येथील विसर्जन घाटावर दुर्घटनेत ११ जणांना विजेचा शॉक लागल्याने गणेशभक्तांमध्ये खळबळ माजली होती. या घटनेतून बोध घेऊन यंदा पनवेल पालिका प्रशासनाने २० वेगवेगळे कृत्रिम तलाव आणि प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणाऱ्या मुख्य अशा चार विसर्जन घाटांवर देखभाल दुरुस्तीसाठी तसेच वीज व्यवस्था मंडपासाठी विशेष नियोजन केले आहे. पालिकेने कृत्रिम तलाव आणि इतर नियोजनासाठी ९३ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नियोजन केले आहे.
हेही वाचा – जालना येथील घटनेचे पडसाद कायम, वाशीत आघाडीने केली निदर्शने
खासगी घरगुती आणि सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शहरातील नदीपात्रात करण्याचा हट्ट असतो. पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी यंदाचा गणपती उत्सव पर्यावरण रक्षणासाठी असे आवाहन करत जास्तीत जास्त नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना विसर्जन घाटांवर कृत्रिम तलावाचा पर्याय मिळावा यासाठी प्रत्येक कृत्रिम तलावासाठी पालिका पावणेचार लाख रुपये खर्च करीत आहे. असे २० तलाव पालिका क्षेत्रात पालिका उपलब्ध करणार आहे.